आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला आले पुन्हा ‘अच्छे दिन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधातील विशाल मोर्चामुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसने जोरदार ‘कमबॅक’ केले आहे. शुक्रवार, १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्य आणि केंद्र सरकारवरील रोषामुळे काँग्रेस आता पुन्हा एकवटली आहे, असाच संदेश या मोर्चामुळे जिल्ह्यात गेला. काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार रावसाहेब शेखावत, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, प्रकाश साबळे यांच्यासारख्या जिल्ह्यातील तडफदार काँग्रेस नेत्यांच्या पाठीशी जनता पुन्हा एकदा खंबीरपणे उभी असल्याचे चित्र या मोर्चाने स्पष्ट केले.

राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला काही महिने काँग्रेसच्या कोणत्याही सरकारविरोधी आवाहनाला जनतेतून प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मागील दोन महिन्यांपासून भाजप सरकारविरोधात जनतेत रोष निर्माण व्हायला सुरुवात झाली.

जनतेचा आवाज बुलंद : काँग्रेसीनेत्यांना मरगळ झाडायची संधी जनतेने उपलब्ध करवून दिली. कॉंग्रेसच्या या नेत्यांनी जनतेत घुसमटणारा हा दबका आवाज ओळखला आणि मोर्चाचे आवाहन केले. सर्वत्र फक्त घोषणा आणि घोषणांचा पाऊस असे सार्वत्रिक चित्र या सरकारमध्ये निर्माण झाले आहे. अच्छे दिन दाखवण्याचा हा प्रभावी नारा भाजपने दिलाय. मात्र, सरकारविरोधातील या रोषामुळे कॉंग्रेसला तर अच्छे दिन येणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या मुद्द्यांकडे वेधले जनतेचे लक्ष
अंगणवाडीच्याबालकांना पुरवण्यात येणारी चिक्की, आदिवासी भागात देण्यात येणारी औषधे, मान्यता नसलेल्या पदव्या, दररोज होणाऱ्या घरफोड्या, दरोडे, विस्कळीत झालेली कायदा सुव्यवस्था प्रणाली, नेत्यांची शपथपत्रातील खोटी माहिती, पीक कर्जाचे होणारे पुनर्गठन, शेतकऱ्यांना नवे पीक कर्ज नाही, असे एकाहून एक भेडसावणारे प्रश्न हेच सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन चर्चेचे विषय झालेत. यामुळे जेवढ्या जलद गतीने प्रसिद्धी झाली तेवढ्याच तीव्रतेने जनतेतील असंतोष वाढू लागला.