आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे जोरदार शक्तिप्रदर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केंद्रराज्यातील भाजप सरकारच्या विरोधात अमरावती जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरीपर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला होता. कहाँ गये, कहाँ गये.. अच्छे दिन कहाँ गये, खो गये, खो गये.. अच्छे दिन खो गये, सातबारा कोरा करा आणि संपूर्ण कर्जमाफी करा, अशी जोरदार नारेबाजी करत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रथमच जिल्ह्यातील सर्व नेते गिले-शिकवे विसरून भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी एकत्रित येऊन मोर्चात सहभागी झाले होते. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दुपारी साडेबारा वाजता हा मोर्चा काढण्यात आला, तर दुपारी दीड वाजता जिल्हा कचेरीवर हा मोर्चा पोहोचला. अगदी सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. ती जिल्हा कचेरी कार्यालयात गेल्यावरही सुरूच होती.

दरम्यान, काँग्रेसचे मोजकेच काही लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर केले. अल्पसंख्याक समुदायाला दिलेले आरक्षण भाजप सरकारने रद्द केले. मदरशांमधील विद्यार्थी हे शाळाबाह्य असल्याचे भाजप सरकारचे म्हणणे आहे. हा शासनाचा निर्णय सामाजिक न्याय नाकारणारा सामाजिक विषमता निर्माण करणार असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. याशिवाय संपूर्ण कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखवून सरकार स्थापन केलेल्या भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.

संपूर्ण कर्जमाफीऐवजी कर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय या शासनाने घेतला आहे. परंतु, शेतकऱ्यांना पुनर्गठन नव्हे, तर कर्जमाफी देण्यात यावी. आमच्या संपूर्ण मागण्या भाजप सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती या वेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी गित्ते यांच्याकडे केली.

वाहतूक झाली विस्कळीत
सकाळीवाजतापासूनच इर्विन चौकात कॉंग्रेसचा एक-एक कार्यकर्ता जुळत गेला. सकाळी ठीक ११ वाजता हा मोर्चा निघणार होता. परंतु, काही लाेकप्रतिनिधींची वाट बघता बघता साडेबारा वाजता हा मोर्चा इर्विन चौकातून निघाला. दरम्यान, या वेळी ऐन राजेश्वरी होलीक्रॉस शाळा सुटण्याची भरण्याची वेळ असल्याने विद्यार्थ्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला. स्कूल व्हॅन, पालकांची वर्दळ तथा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे वाहने हे रस्त्यावरच असल्याने या मार्गावरून जाणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली होती.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कॉंग्रेसकार्यकर्त्यांना आटोक्यात आणण्यासाठी इर्विन चौकापासून ते जिल्हा कचेरीपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. जिल्हा कचेरीवर पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तथा ५० हून अधिक महिला पुरुष पोलिस कर्मचारी उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु, जिल्हाधिकारी कक्षात प्रवेश करताना कार्यकर्त्यांना अडवण्यात थोडी गरमागरमी झाली. आत जाण्याच्या नादात पोलिस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने वातावरण तापले होते. परंतु, त्यानंतर मोजक्याच पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आत सोडले.

जिल्हा कचेरीपुढेच दिला ठिय्या
पोलिसांनीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील गेटजवळ बॅरिकेट्स लावले होते.नारेबाजीसह आंदोलनकर्ते दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा कचेरीवर धडकले. परंतु, पोलिसांनी आंत जाण्यास मज्जाव केल्याने, सर्वच कार्यकर्ते रस्त्यावरच बसले. कार्यकर्ते रस्त्यावर बसल्याने दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूस वाहनांचा मार्ग बदलवण्यात आला होता. बसलेल्या जागेवरच लोकप्रतिनिधींनी भाषणे ठाेकली. साधारणत: दोनपर्यंत भाषणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटबाहेर सुरू होता. भाषणे संपल्यानंतर कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास गेले.

आंदोलनात यांची होती उपस्थिती
माजीमंत्री प्रा. वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, अॅड. यशोमती ठाकूर, केवलराम काळे, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, रावसाहेब शेखावत, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, महापौर रिना नंदा, गटनेता बबलू शेखावत, विलास इंगोले, सुलभा खोडके, किशोर बोरकर, गिरीश कराळे, सरिता मकेश्वर, पुष्पा बोंडे, अरुणा गोरले, संजय अकर्ते, सतीश हाडोळे, छाया दंडाळे, अर्चना सवाई, प्रल्हाद ठाकरे, प्रकाश साबळे, स्वप्निल कोकाटे, सागर देशमुख, यशवंत शेरेकर, वंदना थोरात, शोभा उईके आदींनी सहभाग घेतला होता.

या मागण्यांचा होता समावेश
पेट्रोल, डिझेल, गॅस आैषधीच्या किमती स्वस्त करण्यात यावे
वीज बिल माफ करून रेल्वे भाडेवाढ कमी करावी
भूमी अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा
दुबार पेरणीसाठी १० हजार हेक्टरी रोख मदत द्यावी
संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी