आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर आदिवासी विकास निरीक्षकाला रंगेहात पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- धारणीतालुक्यातील आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने अमरावतीच्या वसतिगृहात प्रतिनियुक्तीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी येथे विनंती अर्ज केला होता. सदर काम करून देतो असे सांगून त्या कर्मचाऱ्याकडून हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आदिवासी विकास निरीक्षकाला अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. २०) धारणी कार्यालयात रंगेहात पकडले. बाबाराव हिरामण खांडेकर (५५) असे एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या आदिवासी विकास निरीक्षकाचे नाव आहे.
खांडेकर धारणी येथील प्रकल्प कार्यालयात कार्यरत आहे.
सध्या विकास निरीक्षकासोबतच सहायक कार्यालय अधीक्षक हा अतिरिक्त कार्यभार खांडकरकडे होता. चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चिखली येथे कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने अमरावती येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे प्रतिनियुक्तीसाठी विनंती अर्ज केला होता.
सदर अर्जावरून प्रतिनियुक्ती देण्यासाठी खांडेकर यांनी सदर कर्मचाऱ्याला पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम जास्त होत असल्यामुळे सदर कर्मचारी खांडेकर यांच्यात चर्चा झाली. चार हजार रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला. दरम्यान, सदर कर्मचाऱ्याने याप्रकरणी अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खांडेकरची तक्रार केली होती. हा व्यवहार गुरुवारी धारणी येथील कार्यालयात करण्याचे ठरले होते.
तक्रार प्राप्त असल्यामुळे तसेच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारच्या वेळी धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला होता. गुरुवारी दुपारी संबंधित कर्मचाऱ्याकडून खांडेकर ही रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खांडेकरला रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक एम. डी. चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक एस. एल. मुंढे, पोलिस निरीक्षक जीवन भातकुले, पोलिस निरीक्षक राजवंत आठवले यांच्या पथकाने केली आहे.