आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमण्यांमुळे आईनेच मिटवली ‘निशाणी’; चिमुकलीला जाळून नंतर फेकले नदीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा (जि. अमरावती)- समाजातून सातत्याने मिळणारे टोमणे तसेच आर्थिक विवंचनेला कंटाळून पोटच्या महिनाभराच्या मुलीला तिच्याच आईने जाळून मारल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील गौरखेडा कुंभी या गावात घडली. याप्रकरणी मृत निशाणीची आई निकिता गोकुळ वाकोडेला पोलिसांनी अटक केली आहे. पेटत्या चुलीत जळून मारण्यात अालेल्या निशाणीवर मंगळवारी माळवेशपुरा या तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मूळचे माळवेशपुरा येथील गोकुळ वाकोडे पत्नी निकिता आणि मुलींसह गौरखेडा कुंभी येथे मामा प्रल्हाद श्रीरामजी नेतनराव यांच्या आश्रयाने राहायला गेले होते. तेथे ते मोलमजुरी करायचे. सोमवारी गौरखेडा कुंभी येथील बिच्छन नदीच्या पात्रात गोकुळ यांची कन्या निशाणीचा अर्धवट जळालेला मृतदेह साेमवारी आढळून अाला होती. प्रल्हाद नेतनराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन निशाणीचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आणि अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

हादरवून सोडणारा आक्रोश
निशाणीच्या अंत्ययात्रेवेळी निर्दयी आई निकिताच्या आक्रोशाला पारावार नव्हता. तिच्या मन हादरवून टाकणाऱ्या विलापामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप निकिताच्या डोळ्यातून ओघळते अश्रू स्पष्ट दाखवत होते.

महिनाभराच्या निशाणीच्या हत्येचा आरोपी शोधून काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. मंगळवारी माळवेशपुरा या गावात चौकशी करताना पोलिसांना निशाणीची आई निकिताबाबतच संशयास्पद माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी निकिताला ताब्यात घेतले पाेलिसी खाक्या दाखवून तिच्याकडे चाैकशी केली. त्यावर घाबरलेल्या निकिताने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, यासाठी निकिताने दिलेले कारण विदारक होते. जबाबात निकिता म्हणाली, ‘दुसरे अपत्यही मुलगी असल्याने लाेक आपल्याला हिणवत होते. त्यातच घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने दोन मुलींचे पालनपोषण लग्नाच्या खर्चाची चिंता होती. दरम्यान, सोमवारी दुपारी सासू इंधन आणायला, तर पती गोकुळ बाहेरगावी गेल्याची संधी साधत निकिताने निशाणीला पेटत्या चुलीत फेकून दिले. यात निशाणी गंभीररीत्या जळाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण निशाणीला नदीपात्रात टाकले.’