आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुड तालुक्यातील वाळू माफियांंचे धाबे दणाणले, दोन ट्रॅक्टर जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड- तालुक्यात सुरू असलेली वाळूची तस्करी रोखण्यासाठी नायब तहसीलदार सुदर्शन शहारे यांनी धडक कारवाई सुरू केल्यामुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. बुधवारी वाडेगाव येथे दोन तर शुक्रवारी शहरातील आठवडी बाजार परिसरात तिसरी कारवाई केली. याप्रकरणी वाळू माफियांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार आशिष बिजवल यांनी दिली.

यापूर्वीही तालुक्यात अवैध वाळू तस्करीला उधाण आले होते, परंतु तत्कालीन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी ठोस पावले उचलत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. भरारी पथक तयार करून वाळू तस्करांना सळो की पळो करून सोडले होते. नऊ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी कारवाईतून लाखो रुपयांचा महसूल शासनाच्या तजोरीत जमा केला होता. मात्र, त्यांना जाऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटत नाही ताेच, वाळू तस्करांनी छुप्या मार्गाने टिप्परऐवजी ट्रॅक्टरने वाळूची तस्करी करणे सुरू केले. याची कुणकुण नायब तहसीलदार सुदर्शन शहारे यांना लागताच त्यांनी अन्य अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने कठोर पावले उचलत दाेन कारवाईदरम्यानच वाळू तस्करांचे धाबे दणाणून सोडले.

बुधवारी नायब तहसीलदार शहारे मंडळ अधिकारी ए. के. बडगे, तलाठी एस. टी. सिडाम यांनी वाडेगाव येथे सचिन दवंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच २७/एल ५६०७), तर वरूड येथे जागृत शाळेजवळ अरुण बिजवे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच २७/ यू ८२६) असे दोन्ही ट्रॅक्टर दुपारी साडेचारच्या सुमारास कारवाई करून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास वरुड शहरातील आठवडी बाजारात तिसरी कारवाई केली. या तिन्ही प्रकरणातील वाळू तस्करांकडून दंडस्वरूप ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे तहसील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे चोरट्या मार्गाने तालुक्यात वाळू तस्करी होत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असून, वाळू तस्करांनी पुसला, देऊतवाडा, वाडेगाव, काटी वघाळ परिसरातून वाळूची तस्करी सुरू केली आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाळूची टिप्परऐवजी ट्रॅक्टरने वाहतूक केली जात असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये दिसून येत आहे. तहसील प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत केवळ दोनच घाटांचे झालेत लिलाव
आतापर्यंत तालुक्यातील केवळ दोनच वाळूघाटांचे लिलाव करण्यात आले आहे. उर्वरित वाळूघाटांवरून वाळू तस्कर रात्रीचा फायदा घेऊन वाळूची तस्करी करीत असल्यामुळे यावर आळा घालण्यासाठी तहसील प्रशासनाला चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.
नायब तहसीलदारांच्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर.

नायब तहसीलदारांनी लक्ष घालावे
^नायबतहसीलदारांनीकेलेली कारवाई लक्षात घेता तालुक्यात वाळू तस्करांचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. नायब तहसीलदारांनी यामध्ये जातीने लक्ष घालून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळाव्यात. जेणेकरून वाळू तस्करीला आळा बसेल. आशिष बिजवल, तहसीलदार,वरुड.

वाळू तस्करांवर बारीक लक्ष
वाळूची तस्करी होत असल्याची कुणकुण लागताच मंडळ अधिकारी तलाठी यांना घेऊन शहरातील जागृत शाळा ग्रामीण भागातील वाडेगावजवळ दोन ट्रॅक्टर पकडून कारवाई केली. वरिष्ठांंनी वाळू तस्करांवर लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. सुदर्शन शहारे, नायबतहसीलदार,वरुड.