आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादवरून आले होते १६ ते १७ दरोडेखोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंधरा दिवसांपूर्वी वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवसा परिसरात एका टायर गोदामावर दरोडा पडला होता. या वेळी दरोडा टाकण्यासाठी उस्मानाबादवरून तब्बल १६ ते १७ जण आले असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. चोरी केलेल्या टायरपैकी जवळपास ७५ टक्के ऐवज ८८ टायर या दरोडेखोरांनी सात लाख रुपयांमध्ये विकल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. ८८ टायरसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये दरोड्याचा मास्टमाइंड बालाजी छगन काळे (३४ रा. मस्सा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) हा असल्याचे पुढे आले आहे. दरोडा टाकण्यासाठी बालाजी घटनास्थळी होता किंवा नाही, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, दरोडा टाकण्यासाठी निवडलेली जागा, दरोड्यानंतर आलेला माल कोणाला कोणत्या ठिकाणी विकायचा, ही सर्व जबाबदारी बालाजीची आहे. २६ जुलैला हा दरोडा पडला त्या वेळी उस्मानाबादवरून जवळपास १७ जण आले होते. एक ट्रक अन्य एका वाहनाद्वारे दरोडेखोर आले होते. त्यांनी दरोडा टाकल्यानंतर लुटून नेलेल्या ११९ टायरपैकी ८८ टायरची बीड येथे सात लाख रुपयांमध्ये विक्री केली होती. गुन्हे शाखा पोलिसांनी मास्टर माइंड, टायर घेणाऱ्यासह अन्य एकाला अटक केली आहे. या तिघांनाही शुक्रवारी न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या दरोड्यांमध्ये सहभागी असलेले आरोपी एकाच परिसरातील असून, त्यांना अटक करण्यासाठी लवकरच पोलिसांचे पथक पुन्हा उस्मानाबादला रवाना होणार आहे.

जवळपास ३५० किलोमीटरवरून येऊन या टोळीने दरोडा टाकलेला आहे. त्यामुळे ही अट्टल टोळी आहे. या टोळीने यापूर्वी कोणकोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहे, याची माहितीसुद्धा शहर पोलिस घेत आहे.

सायबर क्राइमची विशेष कामगिरी
२६जुलैला दरोडा पडल्यानंतर पोलिसांकडे दरोडेखोरांबाबत कोणत्याही प्रकारचा सुगावा नव्हता. दरोडेखोर कोणत्याही ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये कैद नव्हते. त्यांच्याबाबत कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे नव्हती. अशावेळी केवळ सायबर क्राइम पथकाची कामगिरीच दरोडेखोरांचा शोध घेऊ शकत होती. दरम्यान, दरोडेखोर उस्मानाबाद भागातील असल्याची तांत्रिक माहिती सायबर क्राइमला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा सायबर क्राइमच्या पथकाने जवळपास सलग ७२ तास घेतलेल्या मेहनतीमुळे तीन आरोपी ७५ टक्के टायरची जप्ती करण्यात यश आले आहे. सायबर क्राइमच्या या कामगिरीमुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.