आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णबधिरांना चष्म्यामुळे ऐकता येणार आता गाणी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जन्मत:किंवा पूर्णत: कर्णबधिर व्यक्तींना आता चष्म्याने गाणी ऐकता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थिनीने कर्णबधिरांना उपयोगी पडेल, अशी प्रतिकृती तयार केली आहे. अमरावती येथे झालेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन (इन्स्पायर्ड)मध्ये ‘कर्णबधिरांना ऐकण्यासाठी चष्मा’ या प्रतिकृतीने लक्ष वेधले.

कर्णबधिर व्यक्तींना आवाज ऐकू यावा, म्हणून वैद्यकीय क्षेत्रात उपकरणांची निर्मिती केली आहे. मात्र, संगीताचा आनंद घेता यावा म्हणून विशिष्ट स्वरूपाचे उपकरण याला अपवाद होते. ही बाब हेरून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील श्रीमती रुक्मिणीदेवी वडनेरे विद्यालयातील दहाव्या वर्गातील विद्यार्थिनी दीपाली घुगे हिने या प्रतिकृतीची निर्मिती केली आहे. चष्म्याला दोन्ही बाजूंनी डायनामो लावले आहे. दोन्ही डायनामो तांब्याच्या नळीने जोडले अाहेत, डायनामोला सीडी प्लेअरचे वायर लावले आहेत. सीडी प्लेअरमध्ये गाणे सुरू केल्यानंतर हा चष्मा लावल्यास स्पर्शाच्या साहाय्याने कर्णबधिर व्यक्तींना गाणे ऐकता येते. गाणे स्पष्ट ऐकू येण्यासाठी आवाजाची तीव्रता मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. संगीताचा आवाज, डायनामोची फ्रिक्वेन्सीचा ताळमेळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रतिकृतीमध्ये जुळवला आहे. विज्ञान प्रदर्शनात अशा प्रकारची प्रतिकृती विद्यार्थिनीने तयार करणे, हीदेखील गौरवाची बाब आहे. कमी खर्चात उपकरण तयार होत असल्याने याचा कर्णबधिर व्यक्तींना लाभ होण्याची आशादेखील दीपालीने व्यक्त केली आहे. या प्रतिकृतीची निर्मिती करताना दीपालीला शिक्षक राजेश भोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण विभागाने नारायणदास लढ्ढा हायस्कूलमध्ये ‘इन्स्पायर्ड’ हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतले. जिल्ह्यातून १५० प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.