आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीचे प्रचंड नुकसान, तोंडाशी आलेला घास हिरावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी - मागील तीन दिवसांपासून तालुक्यात झालेल्या संततधार पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले केळीचे पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील पथ्रोट, देवगाव, पांढरी, जवलापूर, वडगाव, सिंदी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळीला सध्या घडधारणा होऊन ती काढण्याच्या अवस्थेत आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून सततधार पाऊस जोराच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील केळी भुईसपाट झाली आहे. यामुळे तालुक्यातील केळी उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. पावसाच्या दडीमुळे बहुतांश खरिप पिकांची अवस्था दयनीय झाली होती. त्यामुळे केळीच्या पिकापासून उत्पादकांना मोठ्या आशा होत्या. परंतु ऐन तोंडाशी आलेला घास वाऱ्यामुळे हिरावला गेल्याने केळी उत्पादकांना प्रचंड आर्थिक हादरा बसला आहे. केळीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून पीक उभे केले होते. परंतु,ऐन भरात आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

देवगाव खोडगाव परिसरातील बगा झाल्या भुईसपाट
तालुक्यातीलदेवगाव खोडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची शेती केली जाते. या परिसरात अख्ख्या केळीच्या बागाच भुईसपाट झाल्या आहेत. शासनाने मदतीचा हात द्यावा,अशी मागणी जोर धरत आहे.

अाता सर्व आशाच भुईसपाट झाल्या
लाखो रुपयांचे कर्ज घेऊन केळी उभी केली होती. केळीचे पीक हाताशी आले होते. व्यापारीही खरेदीसाठी येत होते. परंतु आता सर्व आशाच भुईसपाट झाल्या आहेत. श्रीकृष्ण खेडकर, शेतकरी, अंजनगाव सुर्जी.

निम्न वर्धेचा पिकांना तडाखा
निम्नवर्धा प्रकल्पाने धोक्याची पातळी ओलांडल्याने बुधवारपासून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वर्धा नदीला पूर आला. या पुराचे पाणी तालुक्यातील नदीकाठावरील शेतात घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं खरडून गेली आहे. पावसाच्या दडीमुळे चितेंत असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला होता. परंतु पुराच्या पाण्यामुळे नवसंजीवनी मिळालेली पिकं पुरामुळे खरडून गेली आहेत.

धामणगाव रेल्वे तालुक्यातही झटका
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मिर्झापूर परिसरातही केळीच्या पिकांना जबर फटका बसला आहे.जोराच्या वाऱ्यामुळे केळीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. िमर्झापूरचे शेतकरी यशवंत बोरकर यांच्या शेतातील ३२००पैकी ३००० हजार केळीची झाडे उन्मळून पडली आहेत.
मिर्झापूरचे यशवंत बोरकर यांच्या शेतातील तीन हजार केळीची झाडे जमीनदोस्त झाली.
गोकुळसरा (ता. धामणगाव रेल्वे) शिवारात वर्धा नदीचे पाणी घुसल्याने पिकं अशी पाण्याखाली आली आहेत.

पावणे दोन एकरातील पीक वाया, आता खायचं काय ?
मिर्झापूरशिवारात प्रगतीशील शेतकरी यशवंत मारोतराव बोरकर या शेतकऱ्याने मागील वर्षी पावणे दोन एकर शेतात तीन हजार दोनशे केळीच्या कंदाची लागवड केली होती. सध्या प्रत्येक केळीला सरासरी ३५ ते ४० किलोचे घड कापणीला आले होते. परंतु सुसाट वाऱ्यामुळे अंदाजे तीन हजार झाले जमीनदोस्त झाल्याने बोरकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.