आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता आता ‘डिजिटल' पद्धतीचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अनेकदा पोलिसांकडे सबळ पुरावे प्रकरणांचे कागदपत्रे अतिशय चांगल्या पद्धतीने बळकट करूनही घटनेतील साक्षीदार किंवा पंच ऐनवेळी फितूर होतो किंवा आता काही आठवत नाही, असे उत्तर मोघम उत्तर देऊन मोकळा होतो, अशा प्रकारांमुळे गुन्हेगारांना फायदा होतो तो निर्दोष सुटू शकतो, असे प्रकार टाळण्यासाठी यापुढील काळात गंभीर गुन्ह्यांच्या तपासकार्यात डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांनी दिल्या असून, अमरावती पोलिसही आता या डिजिटल पद्धतीचा वापर करणार आहेत.
पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्याच्या पोलिस दलाचे प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारल्यापासून गुन्ह्यांचा छडा लावण्यासोबत पोलिस करत असलेला तपास योग्य पद्धतीने होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी विशेष प्रयत्न चालवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काळात गंभीर गुन्ह्यांचा तपास डिजिटल पद्धतीने पोलिस करणार आहे. यामुळे दोषसिद्धीसाठी फायदा होणार अाहे. डिजिटल पद्धतीमध्ये पोलिसांनी घटनास्थळावर गेल्यानंतर आवश्यक काही वस्तू साहित्य जप्त करायचे असल्यास ती जप्ती इनकॅमेरा करावी. कारण, त्यामुळे वास्तविकता काय आहे? ही बाब दहा वर्षांनंतरही व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमाने पोलिसांना दर्शवता येणार आहे. तसेच प्रत्येक गुन्ह्यात पोलिस पंचाचे जबाब नोंदवतात. तसेच काही प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार घटनेच्या वेळी पोलिसांना जबाब देतात. पंच किंवा साक्षीदार यांचे जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचे असते. कारण त्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना दोषी ठरवण्यासाठी न्यायालयासमोर त्या साक्षीदारांची साक्ष आणि पंचाचा जबाब महत्त्वाचा ठरत असतो. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये घटनेच्या वेळी पंचानी किंवा साक्षीदाराने दिलेली साक्ष न्यायालयात बदलली जात असल्याचा पोलिसांचा अनुभव आहे. काही वेळा साक्षीदार स्वत:हून तसे करतो, तर काही वेळा गुन्हेगारांकडून त्यांच्यावर दबाव येतो. म्हणूनच यापुढील काळात पोलिसांनी घटनेच्याच वेळी साक्षीदारांची साक्ष पंचाचे जबाब व्हिडिओ शूटिंगद्वारे रेकॉर्ड करण्यात येणार आहे. तसेच काही वेळा फिर्यादीसुद्धा मूळ फिर्यादीपासून मागे फिरतो. त्यामुळे फिर्यादीची फिर्यादसुद्धा इनकॅमेरा रेकॉर्ड करण्यात येईल.

कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल नोंद, जसे ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग, संगणकावर तयार केलेले पत्र, मेल, डिझाइन, डिजिटल पद्धतीने काढलेले फाेटो किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने तयार केलेल्या गोष्टींकरिता त्या गोष्टीपुरती एक युनिक व्हॅल्यू संगणकावर मेमरी डिव्हाइसवर रेकॉर्ड होत असते. त्यास "हॅश व्हॅल्यू' असे म्हणतात. "हॅश व्हॅल्यू' त्या नोंदीकरिता अथवा त्या इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल फाइल, फोटो, रेकॉर्डिंगकरिता एकमेवाद्वितीय म्हणजेच युनिक असते. जर एखाद्या पुराव्याचे डिजिटल रेकॉर्ड करत असताना शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हिडिओ शूटिंग केल्यास त्याची 'हॅश व्हॅल्यू'रेकॉर्ड केल्यास दोषसिद्धीसाठी त्याचा भक्कम पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने गोळा केलेल्या पुराव्याची नोंद दोषारोपपत्रात करणे आवश्यक आहे. "हॅश व्हॅल्यू' तयार केल्यानंतर संबंधित फाइल कोणत्याही परिस्थितीत संबंधित तपास अधिकारी किंवा अन्य कोणालाही पाहता येणार नाही. जर ती फाइल उघडली तर त्याची पूर्वी काढलेली "हॅश व्हॅल्यू' आणि उघडल्यानंतर तयार झालेली "हॅश व्हॅल्यू' यामध्ये तफावत असेल. त्यामुळे त्याचा पुरावा म्हणून उपयोगच होणार नाही. कारण तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरणाची फाइल करण्यापूर्वी त्याची "हॅश व्हॅल्यू' काढून ती पंचनाम्यात नोंद तसेच "हॅश व्हॅल्यू' कोणत्या पद्धतीने कोणत्या सॉफ्टवेअरद्वारे, व्हर्जनच्या मदतीने काढली हेसुद्धा नमूद करावे लागणार असल्याचे एपीआय कांचन पांडे यांनी सांगितले.

दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार
^डिजिटल पद्धतीमुळे तपासामध्ये मदत होणार आहे. अनेकदा पंच दिलेल्या जबाबावर कायम राहत नाही. त्यामुळे गुन्हेगार सुटतो. मात्र, डिजिटल पद्धतीमध्ये त्याचे जबाब नोंदवते वेळीच व्हिडिओ शूटिंग करून घेण्यात येईल. त्यामुळे भविष्यात त्याने जबाब फिरवला तरी त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे कायम राहणार आहे. तसेच 'हॅश व्हॅल्यू'मुळे प्रकरणाची गोपनीयता सुरक्षितता ठेवता येणार आहे. यासर्व बाबींमुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढणार आहे. या पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना आम्ही ठाणेदारांना दिल्या आहेत. सोमनाथघार्गे, पोलिस उपायुक्त.

पुढे काय?
अमरावती आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये डिजिटल पद्धत वापरून तपास करावा लागणार आहे त्यामुळे आयुक्तालयातील सर्व तपास अधिकारी कर्मचाऱ्यांना डिजिटल तपासांच्या पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सायबर सेलच्या पथकासोबत फोरेन्सिक लॅबचे तज्ज्ञसुद्धा राहणार आहे. लवकरच या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

पोलिस आयुक्तालयात तयारी सुरू : महासंचालकांच्याआदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिस आयुक्तालयात तयारी सुरू झाली आहे. डिजिटल तपासाच्या अनुषंगाने सायबर क्राइम सेलचे प्रमुख कांचन पांडे संग्राम भोजने यांनी पुण्यात जाऊन विशेष प्रशिक्षण घेतले आहे.पोलिसांनी अशा पद्धतीचा अवलंब केल्यास दोषसिद्धीसाठी मदत होणार आहे. याकामी फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांच्या चमूची मदत घेतली जाणार आहे.