आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरीवर धडकले अादिवासी फासेपारधी बांधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - फासेपारधी समाजबांधव भटकंती करून शिकार करायचे त्याच माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, शिकारीवर बंदी आणल्यामुळे फासेपारधी बांधवांना आता रोजगारासाठी वणवण फिरावे लागत अाहे. त्याकारणाने अनेक फासेपारधी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी शासनाने फासेपारधी समाजापुढील समस्यांचे निराकरण करावे, या मागणीसाठी बुधवार २२ जुलै रोजी आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
आदिवासी पारधी समाज संघटनेचे पदाधिकारी शेकडो महिला-पुरुष कार्यकर्ते समाजबांधव बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास इर्विन चौकात एकत्र आले. त्यानंतर हा शेकडोंचा मोर्चा मागण्यांच्या पूर्ततेसाठी गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हा कचेरीकडे रवाना झाला. या ठिकाणी जवळपास एक तास आपल्या मागण्यांसंदर्भात मोर्चेकऱ्यांनी निदर्शने केली. त्यानंतर माेर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

फासेपारधी समाजातील अनेक व्यक्तींना राहण्यासाठी घर नाही, कसण्यासाठी शेती नाही, मुले शिकायला तयार आहेत, तर अनेक पारधी बेड्यांवर अंगणवाडी नाहीत, शाळा नाहीत, असा आरोप करून आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न फासेपारधी बांधवांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाला केला आहे. शासनाकडून घरकुल योजनेसाठी निधी येतो. परंतु, नमुना 'अ' नसल्यामुळे घर मिळण्यासाठी अनंत अडचणी येतात.

अनेकदा तर शासनाकडून आलेला निधी अशा अडचणींमुळे अखर्चीक राहतो परत जातो. शासनाने राबवलेल्या अनेक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत. उदरनिर्वाहासाठी ई-क्लासची एक ते दोन एकर शेती आम्ही कसली तरी त्यामधील पीक आम्ही घेऊ शकत नाही. या सर्व कारणांमुळे जगण्यासाठी आमच्यापुढे भीषण समस्या उभ्या झालेल्या आहेत. असे मत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी व्यक्त केले. या माेर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष बाबुसिंग पवार, सलीम भोसले, नरेश पवार, राजेश चव्हाण यांच्यासह शेकडों फासेपारधी समाजबांधवांचा समावेश होता.

प्रत्येक कुटुंबातल्या गरजू लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा मागण्या आहेत.

प्रत्येकाचे जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शिबिर घेण्यात यावे
पारधी पॅकेजच्या निधीत वाढ करून बेरोजगारांना न्याय मिळावा
प्रत्येक फासे पारधी बेड्यांवर अंगणवाडी शाळा सुरू कराव्यात
प्रत्येक कुटुंबाला खावटी कर्ज मिळावे
घरकुल योजनेसाठी घराचा नमुना देण्यात यावा
पारधी समाजाला ई-क्लास जमिनीचे पट्टे देऊन ७, १२ नावे करण्यात यावा


अनेक मुद्दे निकाली निघालेत
विविधमागण्यांसदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या वेळी सर्वच मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या वेळी अनेक मुद्दे निकाली निघाले आहेत. मात्र, वन पट्टे वाटपाबाबतचा निर्णय हा राज्य पातळीवरील आहे. त्यामुळे या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही मंत्रालयात धडक देणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यातील फासेपारधी बांधव लवकरच मोर्चा काढणार आहेत. -बाबुसिंगपवार, अध्यक्ष, आदिवासी पारधी समाज संघटना.