अकोला - पाणी पुरवठ्यात सर्वात महत्त्वाची अडचण ठरणाऱ्या पंपाची ट्रायल पूर्ण झाली आहे. पुणे येथून हे पंप अकोल्याकडे दोन दिवसांत रवाना होत आहेत, तर मोटारची ट्रायल पुढील आठवड्यात होत आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे पंप कार्यान्वित होतील.
२००६-२००७ ला पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अकोला महापालिकेने ताब्यात घेतली. यापूर्वी ही योजना मजीप्रा आणि महापालिका दोघांच्या वतीने चालवली जात होती. पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र महान येथे आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात १९९८ ला पाच पंप बसवण्यात आले. या पंपांची वयोमर्यादा १५ वर्षे आहे. परंतु, पंप बसवून १६ पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. महापालिकेने योजना ताब्यात घेतल्यानंतर पंप मोटारच्या देखभाल दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिल्या गेले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून सतत पंप जळण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय होत होता. या अनुषंगानेच महापालिकेने शासनाकडे पंप खरेदीसाठी निधी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर जिल्हाधिकारी त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर शासनाकडे पाठवण्यात आला. महापालिकेने दोन कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने एक कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. यात दहा टक्के लोकवर्गणीची अट घालण्यात आली. लोकवर्गणी भरण्याबाबत विलंब झाल्याने पंप खरेदी अडकली होती. महापालिकेने लोकवर्गणीचा भरणा केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सहा पंप सहा मोटार खरेदीसाठी निविदा बोलावल्या. त्यानंतर पंप खरेदीचा मार्ग मोकळा झाला. पुणे येथे पंप निर्मितीचे काम नुकतेच पूर्ण झाले होते. या अनुषंगाने या पंपाची ट्रायल नुकतीच घेण्यात आली. या ट्रायलला मजीप्राचे अधिकारी उपस्थित होते. ट्रायल यशस्वी झाल्याने येत्या दोन दिवसांत हे पंप अकोल्याकडे रवाना होत आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्रात पंप बसवण्याचे काम पूर्ण होईल. पंप कार्यान्वित झाल्यानंतर पाणीपुरवठ्यातील सर्वात महत्त्वाची अडचण दूर होणार आहे.
पाणीपुरवठ्यातील व्यत्यय संपणार : जलशुद्धीकरणकेंद्रातील पाचही पंप जुने झाले आहेत. यापैकी तीन पंप सुरू आहेत. यापैकी दोन पंप नियमितपणे चालवले जातात, तर एक पंप राखीव ठेवला जातो. परंतु, एकाच वेळी दोन पंप नादुरुस्त झाल्यास पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. वर्षभरापासून हा त्रास अकोलेकर सहन करीत आहेत. परंतु, आता सहा पंप खरेदी करण्यात आल्याने तीन पंपांचा एकाच वेळी वापर केला तरी तीन पंप राखीव ठेवले जाणार आहेत. त्यामुळे पंप बिघडल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय होणे आता कायमस्वरूपी थांबणार आहे.
व्हॉल्व गळतीकडे द्यावे लागणार लक्ष : जलशुद्धीकरणकेंद्रात नवे पंप आणि मोटर बसवल्यानंतर अधिक दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील अडचण दूर झाली असली तरी महान ते अकोला या ९०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती होऊ नये, याची काळजी महापालिका पाणीपुरवठा विभागाला घ्यावी लागणार आहे. कारण अधिक दाबाने पाणीपुरवठा होत असताना या मार्गादरम्यान असणाऱ्या गावांमधील नागरिक त्यांना पाणी मिळावे, या हेतुने व्हॉल्व्हला निकामी करण्याचे कृत्य करू शकतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व्हॉल्व्ह गळती सोबतच शहरातील अंतर्गत जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही पाणीपुरवठा विभागाची वाढली आहे. कारण जलवाहिन्या फुटण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. त्यामुळे या प्रकाराकडेही पाणीपुरवठा विभागाला गांर्भीयाने पाहावे लागणार आहे. तरच खऱ्या अर्थाने एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या पंपाचा फायदा नागरिकांना होईल.