आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केली "त्यांची' दिवाळी गोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नेहमी अंगात मळलेले कपडे, मिळेल ते खायचे, दिवाळी असो किंवा दसरा त्यांची दिनचर्या बदलायची नाहीच. दिवसभर शहरात फिरायचे, मिळेल ते कागद, कचरा गोळा करायचे आणि रात्री मिळेल ते दोन घास खायचे, नाही मिळाले तर उपाशीपोटी झोपायचे, असा त्यांचा नित्यक्रम. अशा व्यक्तींना दिवाळी, नवीन कपडे, फराळातील गोड-धोड पदार्थ हे सर्व स्वप्नवत आहे. मात्र, कोतवाली पोलिसांनी आपल्या नेहमीच्या कामांना फाटा देऊन समाजातील अशाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत गरजू व्यक्तींना दिवाळीनिमित्त नवीन कपडे फराळाचे वाटप करून एक नवा आदर्श उभा केला आहे. पोलिसांच्या या आदर्शवत कामांनी त्या व्यक्तींनाही समाधान मिळाले, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते.

शहर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ठाण्यातच दिवाळीनिमित्त गरजूंना नवीन कपडे फराळांचे वाटप केले आहे. या वेळी प्रभारी पोलिस आयुक्त सोमनाथ घार्गे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच एसीपी मिलिंद पाटील, कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील हजर होते. या वेळी शेकडो महिला, पुरुष लहान मुलेमुली यांची हजेरी होती. ज्यांना दिवाळीसारख्या सणालाही नवीन कपडे घेणे शक्य नाही. फराळाचे गोडधोड त्यांच्या नशिबात नाही. दुसऱ्यांच्या आनंदातच त्यांची दिवाळी आहे. अशा गरजू व्यक्तींना नवीन कपडे, फराळाचे देण्याचा निर्णय कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी घेतला. त्यादृष्टीने प्रयत्न करून शुक्रवारी सकाळी तो निर्णय त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. या वेळी ५५ पुरुषांना बालकांना नवीन शर्ट, २८ मुलींना नवीन पंजाबी ड्रेस आणि ५० महिलांना साडी-चोळी तसेच फराळाचे पॅकेट देण्यात आले. त्यांना कधी नव्हे, अशी सन्मानाची वागणूक पोलिसांकडून मिळाली. अपेक्षित नसलेले नवीन कपडे, फराळाचे पदार्थ पोलिसांनी दिल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

म्हणून काही जण पळून गेले : पोलिसांनीपोलिस ठाण्यात बोलवले, असा निरोप मिळाल्यानंतर अनेकांनी ठाण्यात येता पळ काढला. कारण पोलिसांनी बोलवले म्हणजे, आपल्याला पकडणार असा त्यांचा समज होता. मात्र, आज पोलिसांनी दिवाळीसाठी बोलवले होते. त्यामुळे काहींना तर पोलिसांनी स्वत: जाऊन त्यांना पकडून ठाण्यात आणले. त्या ठिकाणचा कार्यक्रम पाहून त्यांना पोलिस पकडणार नसल्याची खात्री झाली ते बसले.

कधी नव्हे ते समाधान या वर्षी मिळाले
^गरजूंनादिवाळीनिमित्त नवीन कपडे फराळाचे वाटप करण्याचा स्तुत्य निर्णय कोतवालीचे ठाणेदार पाटील यांनी घेतला. आम्ही ठाण्यात जाऊन उपस्थित गरजूंना त्याचे वाटप केले. नवीन कपडे फराळाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यांना पाहून कधी नव्हे, इतके समाधान आम्हाला मिळाले. सोमनाथ घार्गे, प्रभारी पोलिस आयुक्त.

आपल्यासारखी त्यांनी साजरी करावी दिवाळी
^आपण दिवाळी साजरी करताना कुटुंबातील प्रत्येकाला नवीन कपडे, घरात फराळासाठी विविध पदार्थ करतो. अशाप्रकारे प्रत्येकानेच दिवाळी करावी, असा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकातील व्यक्तींना आम्ही ठाण्यात एकत्र करून त्यांना नवीन कपडे फराळाचे वाटप केले. दिलीपपाटील, ठाणेदार, शहर कोतवाली.