आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खग्रास चंद्रग्रहण २८ सप्टेंबरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सोमवार,२८ सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण होणार असून, भारताच्या काही भागांतून खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. हे ग्रहण भारतातून अति पश्चिमेकडील गुजरात राजस्थानमधील काही भागांत चंद्रस्ताच्या वेळी खंडग्रास दिसणार आहे. हे ग्रहण सकाळी ६.३७ ते ९.५७ या वेळेत होणार असून, ज्या भागात ६.३७ नंतर चंद्रास्त होईल तेथून दिसेल.

पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप, अलास्काचा पश्चिमेकडील भाग सोडून अमेरिका येथे ग्रहण खग्रास स्थितीत पाहता येईल. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू इत्यादी भागांत हे ग्रहण दिसणार नाही. चंद्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो. सूर्य, पृथ्वी, चंद्र या तीनही गोलाचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागते. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकूच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो, त्यावेळेस तो पूर्ण दिसेनासा होता. यालाच खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. चंद्र अंशत: दिसेनासा झाल्यास त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी हा जास्तीत जास्त हा १०७ मिनिटे असतो. दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही, कारण चंद्राची भ्रमण पातळी आयनिक पातळीशी अंशांचा कोन करते. पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य, पृथ्वी, चंद्र एका रेषेत येऊ शकत नाही. या विज्ञान युगातसुद्धा ग्रहणासंदर्भात अनेक अंधश्रद्धा रूढ आहे. ग्रहणात फिरू नये, जेवण करू नये, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, ग्रहण झाल्यावर दान करावे, ग्रहण झाल्यावर अंघोळ करावी अशा अंधश्रद्धेला खगोल शास्त्रात आधार नसल्याचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी स्पष्ट केले आहे.