आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ हजारांची लाच; अभियंत्याला पकडले, बिल मंजूर करण्यासाठी मागितली रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कंत्राटदाराचेबिल मंजूर करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या उप कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार, ११ सप्टेंबरला सकाळी सापळा रचून रंगेहात पकडले. जवाहरनगरातील राजेश्वर गणेशराव ठाकरे (वय ५०) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. नवसारी येथील अप्सरा हॉटेलजवळ ठाकरे यांना ही रक्कम घेताना एसीबी पथकाने पकडले.
आरोपी ठाकरे हे चांदूर बाजार येथील महावितरण कंपनीमध्ये उप कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बिल प्रिंटिंग कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठाकरे यांनी तक्रारकर्त्याकडे ही रक्कम मागितली होती. संबंधित तक्रारदाराने मोर्शी विभागाचे उपविभाग आणि चांदूर बाजार येथील २०१४-१५ वर्षाचा बिल प्रिंटिंग या कामाचा ठेका घेतला आहे. दरम्यान, तक्रारदाराचे जानेवारी ते एप्रिल २०१५ या चार महिन्यांचे बिल पाठवायचे होते. सदरचे बिल हे चांदूर बाजार येथील उप कार्यकारी अभियंता राजेश्वर ठाकरे यांच्याकडून मंजूर करून घ्यायचे होते. हे बिल मंजूर करण्यासाठी ठाकरे यांनी कंत्राटदाराकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, कंत्राटदाराने ही रक्कम देण्यास नकार दिला, तर ठाकरे यांनीही बिल मंजूर करत नाही, असे तक्रारकर्त्यास सांगितले. तथापि, कंत्राटदार अखेर आठ हजार रुपये देण्यास तयार झाले.
पैशांची मागणी केल्याची माहिती तक्रारदाराने अगोदरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून पथकाने नवसारी परिसरात सापळा रचून ठाकरे यास रंगेहात पकडले. सदरची रक्कम ठाकरे यांनी गाडीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितली होती. रक्कम स्वीकारताना पथकाने त्यांना पकडून ताब्यात घेतले. दरम्यान, वृत्त लिहिताना आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक एम. डी. चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक एस. एल. मुंढे, पोलिस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल शिरे, कैलाश सानप, श्रीकृष्ण तालन, विशाल हरणे, सैयद ताहीर चालक जाकीर खान यांनी केली. या कारवाईमुळे महावितरण कंपनीमध्ये सुरू असलेल्या लाचखाेरीचा जणू पर्दाफाश झाला आहे.
राजेश्वर ठाकरे