आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विभागातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीविभागातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा माेठ्या प्रमाणावर रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा तब्बल २,७९१ अर्ज कमी आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. बारावीचा चांगला निकाल लागल्यानंतरदेखील अभियंता होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्यादेखील जागा शिल्लक राहणार असून, त्यापाठोपाठ अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्यादेखील मोठ्या प्रमाणात जागा खाली राहणार असल्याचे संकेत आहेत. पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे उच्च शिक्षण घेता यावेत म्हणून मोठ्या प्रमाणात महाविद्यालय आरंभ करण्यात आले. सद्य:स्थितीत अमरावती विभागात एकूण २९ अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, येथील एकूण प्रवेश क्षमता ११ हजार ४३० एवढी आहे.

पश्चिम विदर्भातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना विद्यार्थ्यांकडून कमी अर्ज प्राप्त होणे, ही चिंतेची बाब आहे. महाविद्यालयस्तरावर प्रवेश प्रक्रिया होत असताना जागा पूर्ण भरल्या जात होत्या. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्रीय प्रणालीद्वारे प्रथम वर्ष बीईचे प्रवेश केले जातात. केंद्रीय प्रणालीने प्रवेश प्रक्रिया होत असून, मागील वर्षीदेखील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज विभागातून प्राप्त झाले होते. दहावीनंतर पॉलिटेक्निकला, तर बारावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. पाचही जिल्ह्यांत असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच खासगी संस्थांच्या नामांकित महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पसंती दिली जाते. या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून विशेषकरून प्रयत्नदेखील केल्या जाते. मात्र, अन्य महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. जगामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असून, त्याला अनुसरून अभियंते निर्माण होणे गरजेचे आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बदलाला अनुसरून अभ्यासक्रमात बदल तर केला जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, विद्यापीठात गुणवाढ प्रकरण उघडकीस आले असून, त्यामध्ये सर्वाधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले.

अमरावती यवतमाळ या दोन जिल्ह्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी गुणवाढ करीत उत्तीर्ण हाेण्याचा प्रयत्न केला, मात्र परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्याला आळा बसण्याची शक्यता आहे.

लवकरच चित्र होणार स्पष्ट
अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रथम वर्ष बीई अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रथम फेरी संपली आहे. द्वितीय फेरीतील प्रवेश प्रक्रिया सुरू असून, कोणत्या महाविद्यालयात नेमके किती प्रवेश झाले, याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही. बुधवार, १५ जुलैला द्वितीय फेरीतील प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. द्वितीय फेरीनंतर अभियांत्रिकी प्रवेशाची स्थिती स्पष्ट होणार आहे.

काही महाविद्यालयांत दहापेक्षा कमी प्रवेश
अमरावतीविभागातील शासकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून प्राथमिकता दिली जात असल्याची माहिती आहे. मात्र, काही महाविद्यालयांत दहापेक्षा कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असल्याची माहिती आहे. काही वर्षांपूर्वी नव्याने सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयांची स्थिती प्रवेशाच्या बाबतीत फारच वाईट झाली आहे. दहापेक्षा कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या फेरीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
बातम्या आणखी आहेत...