आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानापूर गवळी येथील शेतकऱ्याची आत्महत्या, अर्धा लीटर विष घेऊन गळफास लावण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- नारायण पंछीरे)
अमरावती- पिकांची दयनीय अवस्था शेतात केलेली गुंतवणूकही निघण्याची आशा मावळल्याने खानापूर गवळी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील नारायण मल्लीकार्जुनआप्पा पंछिरे (४३) या शेतकऱ्याने शेतातच आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. सुरूवातीला त्यांनी अर्धालीटर विष प्राशन केले, जगण्याची इच्छाच नसल्यामुळे यातूनही आपण वाचायला नको म्हणून त्यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. नारायण पंछिरे यांच्याकडे अकरा एकर कोरडवाहू शेती आहे.
यंदा त्यांनी सोयाबीनची परेणी केली आहे. मात्र अपुऱ्या पावसामुळे या पिकातून त्यांना लावलेला खर्चही निघण्याची आशा नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची पत्नीही आजारी आहे. सततची नापिकी, दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, उसनवारी कर्जाच्या परतफेडीची चिंता त्यांना सतावत होती. शनिवारी त्यांच्याकडे जेष्ठा गौरींची स्थापनाही होणार होती. या कार्यक्रमाच्या खर्चाचीही काळजी त्यांना वाटत होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ते घरून शेतात जातो, असे सांगून निघून गेले. पंछीरे नेहमीच सकाळी शेतात गेल्यानंतर सायंकाळपर्यंत शेतातून घरी येत नव्हते.
मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतल्याने कुटूंबीय गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता कुठेही पत्ता लागला नव्हता.अखेर शनिवारी सकाळी शेतात त्यांचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. त्यांच्या पश्चात १५ वर्षांचा मुलगा, १२ वर्षांची मुलगी, पत्नी असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.