आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबिया बहाराला गळती, तडकणारे ऊन अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे तोंडचे पाणी पळाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड/राजुराबाजार - तालुक्यातील आंबिया बहाराला तडकणारे ऊन अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याचा तालुक्यातील संत्रा उत्पादकांना जबर फटका बसणार असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आंबियाच्या गळतीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरत आहे.

तालुक्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा झाडे आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी दोन बहारात उत्पादन घेतात. यामध्ये आंबिया मृग बहाराचा समावेश आहे. या वर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहार हातचा गेला, तर दुसरीकडे योग्य वातावरणामुळे खुललेला आंबिया बहार मात्र, कडाक्याचे ऊन आणि अज्ञात रोगाने गळू लागला आहे.

यामुळे तालुक्यातील टेंभुरखेडा, जामगाव, गव्हाणकुंड, बेनोडा, गोरेगाव, जरूड, पांढरी, सावंगी, गणेशपूर, जामठी, वरुड, सुरळी, आमनेर, एकदरा, झटामझिरी, पिंपळशेंडा, आंतरखोत, बहादा, वाई, राजुरा बाजार, हातूर्णा, उदापूर, बारगाव, लोणी, तिवसाघाट, शेंदूरजना घाट, लोहदरा, देऊतवाडा आदीं भागातील संत्रा बागांमधील आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत. कृषी विभागाने तातडीने सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेतकरी गुरफटला दुष्काळात
एकेकाळी तालुक्यात संत्राचे भरघोस उत्पादन होत असे. परंतु, अलीकडे या ना त्या कारणाने संत्रा उत्पादकांवर संकट कोसळत आहे. कधी गारपीट तर कधी कोरडा दुष्काळ अन् आता रोगाचा प्रादुर्भाव, यामुळे तालुक्यातील संत्रा उत्पादक पुरते हैराण झाले आहेत. एकेकाळी विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा हा भाग आणि या भागातील संत्रा उत्पादकांची आजची स्थिती फारच वाईट आणि दयनीय झाली आहे.

तीन-चार कारणांमुळे होतेय संत्र्याची गळती
^आंबिया संत्राला काही कारणांमुळे गळती लागली आहे. यामध्ये नैसर्गिक वातावरण, देठाला बुरशी लागणे, अन्नद्रव्यांची कमतरता, फळमाशी यांचा परिणाम फळ गळतीवर होऊ शकतो. यावर बुरशीनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.'' एम.बी. वानखडे, तालुकाकृषी अधिकारी, वरुड.

शेतकऱ्यांनी आता करावे तरी काय?
^दरवर्षी शेतकऱ्यांना या ना त्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी करावे तरी काय, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायला हवा.'' मोरेश्वरवानखडे, शेतकरी.

कृषी विभागाला देणार सर्वेक्षणाचे निर्देश
^वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा पिकांची लागवड केली जाते. बहुतांश शेतकऱ्यांचा वार्षिक खर्च हा संत्रा बागांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र, सध्या अांबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत नुकसानाच्या सर्वेक्षणाचे निर्देश कृषी विभागाला देणार आहे. '' डॉ.अनिल बोंडे, आमदार.

नुकसानीचे त्वरित व्हावे सर्व्हेक्षण
^आंबिया बहारावर निसर्गाने रोगाच्या रूपाने घाला घातला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांसमोर आज मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे मोठे नुकसान होऊ लागले आहे. या नुकसानाचे त्वरित सर्वेक्षण व्हायला हवे.'' भारतहोले, शेतकरी

राज्य शासनाने आता आर्थिक मदत द्यावी
^सिंचनाची सुविधा नसतानाही शेतकऱ्यांनी जीवाचे रान करुन संत्रा बागा जगवल्या. यंदा चांगली फळधारणा झाली असता अचानक अज्ञात रोगामुळे गळती सुरू झाली आहे. त्याचा शेतकऱ्यांना जबर फटका बसत आहे. सततच्या नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी हैराण झाला असून, शासनाने आता त्वरित आर्थिक मदत द्यायला हवी.'' सुनील काकडे, शेतकरी.

फवारणीचा कोणताच फायदा झाला नाही
^आंबियावर आलेल्या रोगावर प्रतिबंध म्हणून फवारणी केली. परंतु, हजारो रुपये खर्च करूनदेखील काहीही फायदा झाला नाही. याविषयी कृषी अधिकाऱ्यांनीच मार्गदर्शन करावे.'' मोहनअलोणे, शेतकरी.
नैसर्गिक संकटांचे वार झेलणारे शेतकरी काय म्हणतात?

आशेवर फेरले पाणी
यंदा आंबिया बहाराचे उत्पादन चांगले होण्याची आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. उत्पादनाला चांगला भाव मिळून पैसा हातात येईल, या आशेवर असलेला शेतकरी संत्र्याच्या गळतीमुळे हवालदिल झाला आहे.

मुख्यमंत्री काय देणार
ऑक्टोबर पासूनतालुक्यात संत्रा महोत्सव सुरू होत आहे. अनेक राजकीय नेते शहराला भेट देणार आहेत. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील येणार आहे. त्यामुळे काही ना काही मदत मिळेल, अशी तालुक्यामधील शेतकरी आशा बाळगून आहेत. मुख्यमंत्री तालुक्याला काय देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.