आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘पांढरी माशी’ शिंकणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संपन्न पंजाबातील दोन तृतीयांश कपाशीचे पीक पांढऱ्या माशीने गारद केल्यानंतर शेतकऱ्यांवर कंगाल होण्याची पाळी आली आहे. जिल्ह्यात ‘येलो मोझॅक’ या रोगाची वाहक असलेल्या या माशीने सोयाबीनचे ‘तेल’ काढल्यानंतर तूरही या रोगाच्या विळख्यात सापडली आहे. भविष्यात खरीप रब्बीतील पिके ही माशी गारद करण्याची भीती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर ‘पांढरी माशी’ शिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत शासन कृषी विद्यापीठाने त्वरित दखल घेण्याची गरज निर्माण झाली असून, अन्यथा जिल्ह्याचा पंजाब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. पावसाअभावी सोयाबीनचे पीक आचके देत असतानाच या वर्षी ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सोयाबीनचे पीक गारद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ४० किलोपासून पोतभर उत्पन्न होऊ शकले. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणीही परवडत नसल्यामुळे उभ्या पिकातून ट्रॅक्टर फिरवले. अंजनगावसुर्जी, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वेसह बहुतांश तालुक्यांत या रोगाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी भुईसपाट झाला होता. दरम्यान, सोयाबीनच्या पिकात आंतरपीक म्हणून तुरीची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येते. प्राथमिक अवस्थेतच सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ अवतरल्याने झाडांना फळधारणा होऊ शकली नाही. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होत असल्याने सोयाबीनमधील तुरीवरही याचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांची तुरीच्या पिकावर आशा टिकून आहेत. परंतु, बागायत पट्ट्यातील तुरीवर या रोगाचे सध्या आक्रमण झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान ‘येलो मोझॅक’रोगामुळे झाले होते.

माशीचा जीवनक्रम असा
एकपांढरी माशी १२० अंडी देते. २१ दिवसांत एक पिढी तयार होऊन वर्षभरात तिच्या अनेक पिढ्या तयार होतात.

काय होऊ शकते? : पांढऱ्यामाशीचा प्रादुर्भाव हरभरा, गहू वगळता बहुतांश पिके भाजीपाल्याला बसू शकतो. सध्या पांढऱ्या माशीमुळे ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव बटाटे, तुरीवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या रसशोषक माशीमुळे पिकेच गारद होण्याची भीती सर्वाधिक आहे.

संत्र्यावरही कोळशीची भीती; संत्रा गारद होण्याची शक्यता
जिल्ह्यात नव्वदच्या दशकात काळ्या माशीमुळे कोळशीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे शेकडो हेक्टरमधील बागा शेतकऱ्यांना तोडाव्या लागल्या होत्या. दरम्यान, पांढरी माशी कोळशी रोगासाठी काळ्या माशीपेक्षाही घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात काही भागांत कोळशीही अवतरल्याचे आढळल्यामुळे भविष्यात संत्रा पुन्हा गारद होण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.

‘येलो मोझॅक’ सदृश्य रोगामुळे चांदूर बाजार तालुक्यातील तुरीचे पीक असे पिवळे पडले आहे.
कशी आहे पांढरी माशी?
जिल्ह्यातरस शोषणाऱ्या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु, जहाल औषधांचा वापर करून ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात होता. त्यामुळे आतापर्यंत या माशीमुळे नुकसानाची अत्युच्च पातळी गाठता आली नाही. दरम्यान, साधारणत: सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ नावाचा विषाणूजन्य रोग येत असतो. आतापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव नुकसान शेतकऱ्यांच्या ध्यानातही नव्हते. या विषाणूजन्य रोगाची पांढरी माशी वाहक आहे. ज्या झाडावर ती बसते त्यातील पानांचा रस शोषून पानावर गोड चिटकत द्रव्य सोडते. या द्रवावर काळी बुरशी वाढून कोळशी येलो मोझॅक रोगाला आमंत्रण मिळते. येलो मोझॅकमुळे झाडांची पाने पिवळी पडून आकुंचन पावतात शेंगातील दाणे पोचट राहतात. सोयाबीनच्या पिकात आंतरपीक असलेल्या तुरीवर रोपट्याच्या अवस्थेत या माशीने द्रव सोडला होता. त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

अहवाल पाठवला
^चांदूर बाजार तालुक्यातील तुरीची पाहणी केली आहे. त्यावर ‘येलो मोझॅक’ सदृश्य रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा तपासणी अहवाल वरिष्ठ विद्यापीठाला पाठवला आहे. आर.मेश्राम, तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजार.

तातडीने दखल घेण्याची गरज
^जिल्ह्यातपांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन गारद झाल्यानंतर तुरीच्या पिकावरही ‘येलो मोझॅक’ सदृश्य रोगाची लागण झाली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर निश्चित सांगता येईल. या माशीमुळे संत्र्यासह सर्वच पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. प्रा.राजेंद्र जाणे, कीटकरोग तज्ज्ञ.