आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगा येथील युवा शेतकऱ्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - तालुक्यातील लिंगा येथील डिगांबर सदाशिव कळंबे (वय ४०) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी (दि. १०) रात्री स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी उघडकीस आली. डिगांबर यांना दाेन मुली सुहानी (वय ५) लवा (वय ४) पत्नी असा परिवार आहे.
पांढुर्णा मार्गावर असलेल्या लिंगा येथील डिगांबर रात्रीच्या सुमारास घरून निघून गेले. ते रात्री परतच आले नाही. दरम्यान, त्यांच्या शेताशेजारील शेतकऱ्यांना सकाळी डिगांबर यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. शेतकऱ्यांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते देवेंद्र भुयार यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पावणेतीन लाखांचे कर्ज : डिगांबर कळंबे यांच्याजवळ तीन एकर शेती आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांना शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळू शकले नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्यावर पुसला येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक लाख तीस हजार रुपये, मायक्रो फायनान्स कंपनीचे ६० हजार रुपये तसेच खासगी सावकाराचे ७० हजार रुपये असे एकूण दोन लाख साठ हजारांचे कर्ज असल्याची माहितीही निकटवर्तीयांनी दिली.

मदत मिळवून देऊ
कळंबे यांच्या कुटुंबीयांना मी उद्या भेट देणार आहे. पंचनामा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर प्रस्ताव तयार करून त्वरित आर्थिक मदत मिळवून देऊ. बाळासाहेब तिडके, तहसीलदार, वरुड.