आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटं फुटली तरी पूर्वाने सरावात पडू दिला नाही खंड, भारताला जिंकून दिले रौप्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - साधनाच खेळाडूला घडवत असते. अमरावतीची आंतरराष्ट्रीय धनुर्धर पूर्वा पल्लीवाल याचे उत्तम उदाहरण आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता ती दररोज मैदानावर सरावासाठी उभी दिसते.
सुरुवातीला धनुष्याची प्रत्यंचा ताणून सोडताना बोटं फुटायची एवढेच नव्हे, तर हातावर प्रत्यंचा आदळत असल्यामुळे ते जखमीही व्हायचे, तरीही तिने सरावात कधीही खंड पडू दिला नाही. तिच्या या अविश्रांत परिश्रमाचे फळ तिला सात वर्षांनंतर मिळाले. नुकत्याच द. कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युथ फेस्टामध्ये तिने सांघिक गटात रौप्यपदकाची कमाई केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणारी ती अमरावतीची एकमेव धनुर्धर होय.
जिद्द, चिकाटीच्या बळावर भारतीय संघात स्थान पटकावणारी पूर्वा ही महाराष्ट्रातील एकमेव धनुर्धर होती. या स्पर्धेत २७ देशांमधील २५० धनुर्धर सहभागी झाले होते. भारतीय मुलींच्या रिकर्व्ह संघात महाराष्ट्राची पूर्वा पल्लीवाल, पंजाबची सिमरजीत कौर, झारखंडची अंकिता भगत, तर मुलांच्या संघात हरियाणाचा रॉबिन, आसामचा मुकेश बोरो आणि हरियाणाचा आदित्य प्रताप यांचा समावेश होता. वयाच्या १३ व्या वर्षी पूर्वाने धनुर्विद्या या खेळाला सुरुवात केली. समर्थ आर्चरी अकादमीचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनात तिने अल्पावधीतच कौशल्य प्राप्त केले.

भारतीय संघात संधीची वाट : पूर्वा ही अमरावती येथील उत्कृष्ट धनुर्धर असून, तिने अविश्रांत परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाद्वारे मोठे यश संपादन करून भारतीय धनुर्विद्या महासंघाचे लक्ष वेधले आहे. ती भारतीय संघात केव्हा संधी मिळते याचीच वाट बघत आहे. तिच्यात देशाचे प्रतिनिधित्वच करण्याची नव्हे, तर यश मिळवून देण्याचीही क्षमता असल्याचे मत तिचे प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.