आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांची पहिली तिरंदाजी स्पर्धा; स्पर्धक शिवराय-अर्जुन तर प्रशिक्षक कार्टुन वेशात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भारतीय धनुर्विद्या महासंघाच्या मान्यतेने अन् महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेतर्फे यवतमाळ येथे नुकतीच ९ वर्षांखालील चिमुकल्यांसाठी मिनी सब-ज्युनिअर तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही देशातील आणि संपूर्ण विश्वातील ९ वर्षांखालील वयोगटासाठी आयोजित पहिलीच स्पर्धा होय.

चिमुकल्यांवर कोणताही ताण न येता वयाच्या १८ व्या वर्षी देशाला उत्तम आंतरराष्ट्रीय धनुर्धर िमळावेत हाच यामागील मुख्य उद्देश होता. मुलांवर स्पर्धेत खेळताना कोणतेही मानसिक दडपण येऊ नये म्हणून अगदी आल्हाददायक तसेच मुलांना आवडतील अशा वातावरणात ही स्पर्धा घेण्यात आली. पंचांना बघून मुलांच्या मनावर दडपण येऊ नये, ते आपले मित्रच आहेत असे वाटावे म्हणून पचांना मिकी, डोनाल्ड यासारख्या कार्टून पात्रांच्या रूपात सादर करण्यात आले. अगदी दरवाजापासून चिमुकल्यांना वाजत गाजत स्टार्ट लाईनजवळ आणले गेले. यामुळेच मुलांच्या मनावरील अर्धा ताण कमी झाला. त्यानंतर ते श्रीराम, अर्जुन, शिवराय यासारख्या वीर योद्ध्यांच्या रूपात मुलांनीही मनात येईल तशी तिरंदाजी केली.

चीन, द.कोरियासारखे देश धनुर्विद्या या खेळात आॅलिम्पिकमध्ये खोऱ्याने पदकं जिंकत असताना आपणही मागे राहायला नको, यासाठी मुलांना खेळ अन् मनोरंजनाच्या रूपात का होईना स्पर्धात्मक खेळाची जर वयाच्या ९ वर्षांच्या आत सवय जडली तर ते वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारू शकतात, या विचाराने पछाडलेले माजी आंतरराष्ट्रीय धनुर्धर आणि महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर तसेच राज्य आॅलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे यांनी भारतीय धनुर्विद्या महासंघासोबत गत एक वर्ष लढा द्यावा लागला. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनातील सर्व शंकांचे समाधान झाल्यानंतरच त्यांनी स्पर्धा घेण्यास मान्यता िदली. स्पर्धा आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश विश्वकर्मा, प्रफुल्ल डांगे, अमर जाधव यांनी सहकार्य केले.

पदवीधर खेळाडूच्या जबाबदाऱ्या वाढतात
वयाच्या १४ वर्षांपासून देशात खेळाडू घडतात. परंतु, ज्यावेळी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यास सज्ज असतात त्यावेळी म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी आपल्या देशातील परिस्थितीनुसार त्या खेळाडूवर नोकरीसाठी सज्जता व खेळ अशा अशा दुहेरी जबाबदाऱ्यांचे ओझे असते. अशात त्याला ना धड खेळाकडे ना धड नोकरी िकंवा उच्च शिक्षणाकडे लक्ष देता येत. बहुतांश खेळाडू मग खेळ सोडून कारकीर्द घडवण्याच्या मागे लागतात. ज्या खेळाडूवर आठ ते दहा वर्षे परिश्रम घेतले त्यानेही खेळ सोडला असतो. यात देशाचे नुकसान होते. म्हणून मग १४ नव्हे तर ९ वर्षांपासूनच खेळाडू घडवायचे असा िनर्धार चांदूरकर व अॅड. देशपांडे यांनी केला.

मुलांवर दडपण येऊ नये ही अटही केली पूर्ण
िमनी सब-ज्युनिअर स्पर्धा अायोजित करताना भारतीय धनुर्विद्या महासंघाने मुलांवर कोणताही मानसिक ताण येऊ नये, अशी अट घातली होती. या अटीची पूर्तता करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांसोबतच, समुपदेशक व क्रीडा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यांच्या सल्ल्यानुसार पहिल्या ९ वर्षांखालील मिनी सब-ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो खेळाडू व पालक सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...