अमरावती - अजातशत्रू रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांना रविवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी एक वाजताच्या सुमारास काँग्रेसनगरातील कमलकृष्णवरून त्यांची अंत्ययात्रा दारापूरच्या दिशेने निघाली. त्यानंतर मार्गातील प्रत्येक चौकात चाहत्यांनी त्यांना मानवंदना दिली. दादासाहेबांना निरोप देताना अख्खे समाजमन गहिवरले. अंत्ययात्रेला दूरदूरवरून मोठा जनसागर लोटला होता.
बिहार, केरळचे राज्यपाल, राज्य विधान परिषदेचे सभापती, जागतिक बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष, संसद सदस्य, अशी अनेकविध पदे भूषवलेल्या दादासाहेबांचे शनिवारी दुपारी नागपूर येथे एका खासगी इस्पितळात निधन झाले होते. रविवारी सायंकाळी दारापूर (ता. दर्यापूर) या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध पक्षांचे पुढारी-कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी उशिरा रात्री दादासाहेबांचे पार्थिव कमलकृष्ण या त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. त्यानंतर रविवारी सकाळी ११.१० वाजताच्या सुमारास ते नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी बाहेर काढण्यात आले. सर्वप्रथम पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर सरकारी अधिकारी-कर्मचारी राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी दर्शन घेतले.
दिग्गजांनीही घेतले अंत्यदर्शन : आमदार डॉ. सुनील देशमुख, रवी राणा, अॅड. यशोमती ठाकूर, पीरिपाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, महापौर चरणजितकौर नंदा यांच्यासह माजीमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, नरेशचंद्र ठाकरे, मिलिंद चिमोटे, सुनील वऱ्हाडे, गणेश रॉय, अॅड. यदुराज मेटकर, दिलीप काळबांडे, किरण पातुरकर, मुजफ्फर मामू, प्रा. डॉ. प्रदीप दंदे, भूषण बनसोड, हरिभाऊ मोहोड, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, माजी आयुक्त एन. आरमुगम आदींनी अंतिम दर्शन घेतले.
अशोक चव्हाण, विखे पाटील अन् पटेलही आले
दादासाहेबांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण खास नांदेडहून अमरावतीत दाखल झाले. त्यांच्यासोबत विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सावनेरचे आमदार सुनील केदारदेखील होते. काही वेळाने रिपाइं नेते खासदार रामदास आठवले, राकाँचे वरिष्ठ पदाधिकारी प्रफुल्ल पटेल माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही अमरावती गाठून दादासाहेबांच्या अंत्ययात्रेत भाग घेतला.
मानसपुत्र पार्थिवाजवळच
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांना दादासाहेब मानसपुत्र मानत. त्यांच्या प्रत्येक कृतीला दादासाहेबांचा मूकपाठिंबा असायचा. त्यामुळे पोटे आणि दादासाहेबांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. स्वाभाविकच दादासाहेबांच्या निधनामुळे त्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान भावना विव्हळ पोटे रात्रीपासूनच बंगल्यावर तळ ठोकून होते. न्यायमूर्ती भूषण गवई, डॉ. राजेंद्र गवई, रामेश्वर अभ्यंकर यांच्यासोबत ते दारापूरपर्यंत स्मृतिरथावर पार्थिवा शेजारीच बसले होते.
राष्ट्रध्वजात गुंडाळले पार्थिव
राज्यपालासारखे संवैधानिक पद भूषवले असल्याने दादासाहेबांचे पार्थिव राष्ट्रध्वजात (भारतीय तिरंगा) गुंडाळले होते. हा देह हार-फुलांनी सजवलेल्या स्मृतिरथावर ठेवण्यापूर्वी भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांच्या हस्ते घरातच बौद्धविधी झाला.दरम्यान अंत्ययात्रा सुरू करण्यापूर्वी बंगल्यावर हजारो चाहत्यांनी पोहोचून आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेतले. बंगल्यावरील गर्दीचे नियंत्रण पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे एसडीओ प्रवीण ठाकरे यांनी सांभाळले.
इर्विन चौकात आठवले, कुंभारे यांची आदरांजली
राजकमलचौकातून श्याम चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक या मार्गाने अंत्ययात्रा इर्विन चौकात पोहोचली. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दादासाहेबांचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई, डॉ. राजेंद्र गवई यांच्याकडून हार अर्पण करण्यात आले. इर्विन चौकात रिपाइंचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पीरिपाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री अॅड. सुरेखा कुंभारे, भूपेश थूलकर यांनी दादासाहेबांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. अंत्ययात्रा पंचवटी चौकात पोहोचली. पंचवटी चौकात फ्लायओव्हर तसेच रस्त्याच्या दोन्ही कडेला उभ्या नागरिकांकडून पार्थिवावर पुष्पवर्षाव करण्यात आला.
राजकमलमध्ये वाहिली श्रद्धांजली
अंत्ययात्रा राजकमल चौकात पोहोचताच हव्याप्रमं नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर वैद्य नवयुवक विद्यार्थी संघटनेचे संजय देशमुख ,बबनराव रडके यांनी पुष्पचक्र अर्पण केले.या वेळी आमदार रवी राणा, विलास इंगोले, मनपा पक्षनेते बबलू शेखावत, डॉ. सावदेकर, माधुरी चेंडके प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. श्रीकांत चेंडके, प्रा. वसंतराव हरणे, प्रा. संजय तिरथकर, राजूभाऊ महात्मे, दिलीप मेहरे, गोटूभाऊ राठोड, राजू परिहार, आनंद धवने, विकास पाध्ये, पप्पू राठोड, बी. डी. देशमुख, संतोष इंगोले, लक्ष्मीकांत खंडागळे, विलास दलाल, विकास कोळेश्वर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुळकर्णी, सोमेश्वर पुसदकर, प्रा. किशोर फुले, राजाभाऊ मोरे, विवेक कलोती, भूषण पुसदकर आदी उपस्थित होते.