आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांना भावपूर्ण निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अत्यंत मंगलमय भक्तिभावाने वातावरणात सुरू असलेला गणेशोत्सव आज, रविवारच्या अनंत चतुर्दशीमुळे संपुष्टात आला. गणेशोत्सवाचा दहावा दिवस असल्याने अनेकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या निरोपासाठी छत्री तलाव, वडाळी तलाव खासकरून विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रथमेश तलावावर नागरिकांची गर्दी उसळली होती.

विसर्जनाचा मुहूर्त दुपारी १२ च्या आसपास संपणार असल्याने सकाळच्या प्रहरातच नागरिक घरांबाहेर पडले होते. प्रत्येकाने जमेल त्या वाहनातून बाप्पाला विसर्जनस्थळी आणले. काही तर चक्क डोक्याची ढाल करून पायीच बाप्पाला घेऊन येत होते. दिवसभरात अशा हजारो मूर्ती याठिकाणी विसर्जित करण्यात आल्या.

विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर रंग-गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’ असा गजर सुरू होता. कुणी सायकलवरून तर कुणी कटल्यामध्येच बाप्पाची स्वारी करीत होते. मोदक, डाळ-पोह्यांचा प्रसाद आणि हार-गुच्छांचा खच असे या तलावांशेजारचे वातावरण होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी एकटे नव्हे, तर अख्खे कुटुंबच जायचे असल्याने पुरुष-महिलांसह लहान मुले, तरुणही याठिकाणी एकत्र आले होते. एकूण काय तर संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय झाले होते.

ढोल-ताशांच्या निनाद उधळला आसमंतात
घरगुतीगणपतींसह काही सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचेही आज विसर्जन करण्यात आले. त्यामुळे शहराच्या मध्यभागात ढोल-ताशांचा प्रचंड निनाद होता. उशिरा सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या निनादामुळे अख्खी अमरावती गणेशमय झाली होती. दरम्यान, आगामी एक-दोन दिवसही हेच चित्र शहरांत दिसून येणार आहे. दरम्यान, प्रशासकीय पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील ५१४ मंडळांपैकी २५४ मंडळांच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले.

नीळकंठचे आज, तर न्यू आझादचे रोजी विसर्जन
अमरावतीतगणेश विसर्जन एकाच दिवशी होत नाही. सतत दोन-तीन दिवस हे पर्व सुरू असते. या शृंखलेत उद्या, सोमवार, २८ सप्टेंबरला सायंकाळी वाजता बुधवाऱ्यातील नीळकंठ गणेश मंडळाची मिरवणूक निघणार आहे, तर 1 ऑक्टोबरला दुपारी न्यू आझाद मंडळाने स्थापन केलेल्या ‘विदर्भाचा राजा’ची विसर्जन मिरवणूक निघेल, असे त्या-त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे. शहरातील वाहतूक आणि पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी असे टप्पे केले आहेत.

खास पोहणाऱ्यांच्या हस्ते मूर्ती विसर्जन
प्रथमेशतलाव हे बायपासच्या पलीकडे असलेल्या आशियाना क्लबजवळील खुल्या जागेत तयार करण्यात आले होते. खोदकामामुळे नैसर्गिकरीत्या जमिनीला पडलेले तीन मोठे खड्डे म्हणजे प्रथमेश तलाव होते.शिवाय मूर्ती विसर्जनासाठी याठिकाणी खास प्रशिक्षित पोहणाऱ्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे पूजाअर्चा आटोपल्यानंतर गणेशभक्त श्रींची मूर्ती त्यांच्या हवाली करून देत होते. या सोईमुळे कोणताही धोका उद्भवला नाही.

सूचना फलकासह होता पोलिसांचा बंदोबस्त
गणेशिवसर्जनासाठी खासकरून तयार करण्यात आलेल्या प्रथमेश तलावावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार रवि राणा, मनपा. आयुक्त चंद्रकांत गुडेवार आणि पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी शनिवारीच या स्थळांची पाहणी केली होती. त्यामुळे गणेशभक्तांना आज कोणताही त्रास झाला नाही. चांगले रस्ते, रस्त्यांचे बॅरिकेटिंग, रुग्णवाहिका आणि पोहणाऱ्यांची चमू, पोलिसांसाठी खास तंबू, फिरता दवाखाना, अशी सर्व प्रकारची सोय याठिकाणी होती.

जिल्हाधिकाऱ्यांनीही धरला फेर
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या शासकीय निवासस्थानी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी बाप्पाला निरोप देण्यापूर्वी एरव्ही प्रशासकीय कामात व्यस्त राहणारे आणि दिसणारे जिल्हाधिकारी गित्ते पत्नी उषा यांच्यासह बंगल्यावर डीजेच्या तालावर असा फेर धरला होता.

भाविकांना प्रतीक्षा आता नवदुर्गोत्सवाची
अमरावतीतगणेशोत्सवाप्रमाणेच नवदुर्गोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरातील बहुतेक भागांत घटस्थापनेच्या दिवशी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवानंतर लगेच काही दिवसांनी हे पर्व सुरू होत असल्याने अमरावतीकरांना आता त्याची प्रतीक्षा लागली आहे.हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी १३ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळे त्या दिवसाची प्रतीक्षा आतापासूनच केली जात आहे.