आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस ग्राहकांना ७५ रु.चा भुर्दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एचपी,भारत इण्डेन या तिन्ही कंपन्यांच्या सिलिंडर वितरकांकडून अमरावती शहर जिल्ह्यात गॅस कनेक्शनची ग्रामीण भागात तसेच शहरात अंबा गेटच्या आत तपासणी सुरू झाली आहे. यासाठी ग्राहकांना केंद्र सरकारद्वारे निश्चित ७५ रु. तपासणी शुल्क द्यावे लागते. त्याची पावतीही संबंधित कंपनीचे कर्मचारी ग्राहकांना देत असतात. मात्र, गॅस मेकॅनिकला नेमके ही तपासणी कशासाठी, त्याचे भविष्यातील फायदे काय, सुरक्षा किती महत्त्वाची याबाबत व्यवस्थित सांगता येत नसल्यामुळे शहर ग्रामीण भागातील ग्राहक बुचकाळ्यात पडले आहेत. गॅस कंपन्या उगाच आमच्यावर ७५ रुपयांचा भुर्दंड लादत आहेत, असे त्यांना वाटत आहे. कारण अशा सुरक्षा तपासणीची पूर्वसूचनाच देण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्राहक गॅस मेकॅनिकला घरात घेण्यास सहज तयार होत नाहीत. अशा तपासणीचा समाजकंटक लाभ उचलू शकतात, अशी भीती ग्राहकांना वाटत आहे.
गॅस कंपन्यांनी वितरकांना पाठवलेल्या परिपत्रकात ही तपासणी दर दोन वर्षांनी होणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच सिलिंडर बाॅय ते पोहोचवताना कनेक्शनची तपासणी करतो त्यापेक्षा ही तपासणी वेगळी असावी. तज्ज्ञ गॅस मेकॅनिक्सला पाठवूनच ही तपासणी करावी. तसेच ब्ल्यू बुकवर शेगडी, सिलिंडर, नळी आणि रेग्युलेटर व्यवस्थित असल्याची नोंद करावी, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही वितरक त्यांच्या सोयीनुसार ही तपासणी करीत असतात, हे येथे उल्लेखनीय!

जे ग्राहक ही तपासणी करून घेणार नाहीत, त्याच्या ग्राहक क्रमांकासह ब्ल्यू बुकवर नोंद घेऊन लगेच वितरकाने त्याला पत्र पाठवायला हवे. तसेच सुरक्षा किती महत्त्वाची याची माहिती द्यायला हवी. कारण जर दुर्घटना घडली अन् त्याने कनेक्शनची तपासणी केली नसेल, तर त्याला नुकसानभरपाईसाठी दावा करता येणार नाही, असेही स्पष्टपणे नमूद करण्यात यावी, असे निर्देश कंपनीने परिपत्रकाद्वारे वितरकांना दिले आहेत.

तपासणी नाकारणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन होणार कट : दरदोन वर्षांनी आवश्यक सुरक्षा तपासणी जर ग्राहक वितरकाने पत्र पाठवल्यानंतर करून घेत नसेल, तर त्याचे कनेक्शन धोकादायक असल्याच्या सबबीखाली ते बंद करण्याचा अधिकार वितरकाला असेल. वितरक त्याच्या सिलिंडरचा पुरवठा रोखू शकतो. त्याचप्रमाणे जे वितरक नियमितपणे सुरक्षा तपासणी करणार नाहीत. त्यांचा पुरवठा कंपनी राेखू शकते.

नुकसान भरपाई मिळणे होणार सोपे : अमरावतीजिल्ह्यात हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इण्डेनचे आॅइल काॅर्पोरेशन, या तीन कंपन्यांचे सिलिंडर बहुतांश ग्राहक वापरतात. या कंपन्यांनी सुधा जोशी कमिशनच्या शिफारसीनुसार ग्राहकाने कनेक्शन वितरकाकडून घेतल्यानंतर त्याची दोन वर्षांनंतर तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. तपासणी झाल्यानंतरही दुर्घटना घडली, तर नुकसानभरपाई मिळवणे सोपे होणार आहे. ग्राहकाला जास्तीत जास्त २० लाखांपर्यंत भरपाई मिळत असते.


पैशांपेक्षा जीव महत्त्वाचा
^नियमा नुसार दरदोन वर्षांनी तपासणी करणे आवश्यक आहे. अन्यथा कंपन्या वितरकांवर कठोर कारवाई करू शकतात, कारण जीव महत्त्वाचा आहे. दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून तपासणी करायलाच हवी. संजय देशमुख, अध्यक्ष,अमरावती जिल्हा गॅस डिलर्स असोसिएशन.

पुढे काय?
एकतर ही तपासणी नियमित करायला हवी. तसेच तपासणीसाठी जाणारे कर्मचारी अधिकृत असल्याचे त्यांना ओळखपत्र द्यायला हवे. त्यांना शहरापेक्षा ग्रामीण भागातील ग्राहकांना नेमकी तपासणी कशासाठी पटवून देता येईल, याची वितरकांनी काळजी घ्यायला हवी. कारण दुर्घटना घडल्यास कंपन्या सिलिंडर, रेग्युलेटर, शेगडी, नळीची तपासणी झाली काय? याची खात्री करून घेतात. जर झाली असेल, तर नुकसानभरपाई मिळण्यासाठी कोणतीही अडचण भासत नाही, याबाबत व्यवस्थित समजावून सांगायला हवे, तेव्हाच भ्रम दूर होईल. तसेच नियमानुसार सिलिंडर कसे वापरावे याबाबतही जागृती होईल.

गैरप्रकारांना बसेल आळा
गॅस कनेक्शनचा घोळ कमी होईल. एका घरात किती सिलिंडर आहेत याची माहिती मिळेल. अनेक ठिकाणी पारदर्शक पेट्रोलची वा डुप्लिकेट नळी वापरलीे, त्यांना कंपनीच्या नळ्या वापरण्याची सक्ती केली. सिलिंडर खाली,शेगडी वर ठेवण्यास सुचवले. रेग्युलेटर डुप्लिकेट तर नाही ना, याची तपासणी केली, अशी माहिती भारत गॅसचे व्यवस्थापक हरीश भेरडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...