आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली विक्री प्रकरणाचा तपास एसीपींच्या स्वतंत्र पथकाकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातून मुलींना गुजरातमध्ये नेऊन दलालांच्या माध्यमांतून त्यांची लाखो रुपयांमध्ये विक्री करणाऱ्या चार दलालांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने गुजरातमध्ये अटक करून सोमवारी (दि. ५) त्यांना शहरात आणले. सोमवारीच त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसीपींच्या नेतृत्वात स्वतंत्र पथक तयार केले आहे.
नौशील कुमार कन्नू पटेल (३५), कल्लुभाई डायाभाई पटेल (६१), इस्माईल ऊर्फ राजा भिकाभाई परमार (४४) आणि मोहम्मद इक्बाल रियाजोद्दीन (४५,सर्व रा. बसोत जि. आनंद, गुजरात) या चौघांना फ्रेजरपुरा पोलिसांचे पीएसआय राम गित्ते त्यांच्या पथकाने दहा दिवसांच्या प्रयत्नानंतर गुजरातमध्येच अटक केली. त्यांना घेऊन पोलिस पथक सोमवारी शहरात आले, या चौघांनी आतापर्यंत चार मुलींची गुजरातमध्ये विक्री केल्याचे सांगितले आहे. या चारही दलालांचे अमरावती शहरातील काही दलांलासोबत व्यावहारिक सबंध आहे. शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील मुलींना गाठून नाकरीचे आमिष दाखवून त्यांना गुजरातमध्ये नेले जाते.
या मुलीला चौघांपैकी एकाकडे दिले की, शहरातील दलालाला मुख्य दलाल ४० हजार रुपये देतो. त्यानंतर मुख्य दलाल मुलीची विक्री करतो. या विक्रीतून मुख्य दलाल किमान दीड लाख रुपये घेतो. या मुलींचे गुजरातमधील पुरूषांसोबत लग्न करण्यासाठी विक्री केली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाचा उत्तम तपास व्हावा या दृष्टीने पोलिस उपायुक्तांनी सदर तपास फ्रेजरपुराचे एसीपी यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करून त्यांच्याकडे सोपवला आहे. या चौघांनी शहरातील किती व्यक्तींसोबत संपर्क ठेवून आतापर्यंत किती मुलींची गुजरातमध्ये विक्री केली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. याच प्रकरणात चार दिवसांपुर्वी अटक केलेल्या शहरातील दोन महिलांची पोलिस कोठडी सोमवारी संपल्यामुळे त्यांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.न्यायालयाने या दोघींनाही डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...