आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यत्व ग्रुपने फुलवली हिरवळ, ग्रीन सिटी, क्लीन सिटी अभियानाचा घेतला वसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंध विद्यालयात वृक्षारोपण करताना कर्तव्यत्व ग्रुपचे सदस्य. - Divya Marathi
अंध विद्यालयात वृक्षारोपण करताना कर्तव्यत्व ग्रुपचे सदस्य.
अमरावती - वसुंधरेचा व‍िनाश थांबवा, असा नारा देत कर्तव्यत्व ग्रुपने शहरातील डॉ. भिवापूरकर अंध विद्यालयात हिरवळ फुलवली आहे. विद्यालय परिसरात वृक्षारोपण करुन शिक्षणासोबतच विद्यालयातील मुलांना आता या झाडांमुळे सावली मिळणार आहे. ग्रीन सिटी, क्लीन सिटीसाठी या ग्रुपने पुढाकार घेतला असून स्वच्छता अभियानासोबतच या रविवारी अंध विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील विद्यार्थी युवक बिरादारी यांनी हा वसा घेतला आहे. दरम्यान, प्रत्येक रविवारी शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसोबतच, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त शहर आदी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प या तरुण नवोदित तरुण-तरुणींनी घेतला आहे. विशेष म्हणजे, यासर्व विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करुन रोपटे विकत घेतली. त्यानंतर महाविद्यालयातील परिसरात जाऊन वृक्षारोपण केले. वसुंधरा बचावचा नारा देत ग्रुपमधील युवक-युवतींनी शहरातील स्वच्छतेसोबत हिरवळीसाठी आता त्यांचे हात पुढे सरसावले आहे. युवक बिरादरी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने दर रविवारी क्लीन सिटी अभियान राबवण्यात येत आहे.
सामाजिक कार्यात छोटासा सहभाग नोंदविण्यासाठी तथा प्रसिद्धीपासून दूर राहून हे सर्व विद्यार्थी प्रत्येक रविवारी एका ठिकाणी गोळा होऊन स्थळ निश्चित करतात. पुढे स्थळ निश्चित झाल्यानंतर मग यांच्या अभियानाला खरी सुरुवात होते. सकाळी नऊ वाजता कर्तव्यत्व ग्रुपतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाबद्दल विद्यालयातील प्राचार्यांनीही ग्रुपचे कौतुक केले.
यावेळी कर्तव्यत्व ग्रुपचे गौरव इंगळे, मधुलिका देशमुख, वैष्णवी निचत, शुभम देशमुख, यशवर्धन निचीत, पुनीत देशमुख आदी उपस्थित होते.
दर रविवारी क्लीन सिटीचा प्रयत्न
मागील रविवारपासून कर्तव्यत्व ग्रुपने हे अभियान शहरात सुरु केले आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण करुन क्लीन सिटी, ग्रीन सिटी बनविण्याचे ध्यास ग्रुपने घेतला आहे. गेल्या रविवारी ग्रुपतर्फे बसस्थानक अंबादेवी परिसरात स्वच्छ अभियान राबविण्यात आले होते. पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाल्याने या रविवारी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रुपतर्फे सांगण्यात आले.