आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदपत्रांची जुळवाजुळव, पालकांची होतेय दमछाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरजगाव कसबा - शिक्षण प्रणाली आता हायटेक होत आहे. यात ग्रामीण भागही मागे राहिलेला नाही. राज्यातील सर्व शाळांना शासनाने संगणकीकृत स्टुडंट डाटा बेस तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करताना पालकांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.
स्टुडंट डाटा प्रणालीसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्ड, जन्माचा दाखला, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, रक्तगट आदी माहिती आवश्यक आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे. शाळेने जे दाखले विद्यार्थ्यांना सांगितले आहे, त्यांची जमवाजमव करण्याच्या कामात पालक गुंतले आहेत. पाल्यांचा जन्माचा दाखला मिळवण्यासाठी पालकांना वारंवार येथील ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. मुख्य म्हणजे ही सर्व कागदपत्रे शाळेमध्ये कधीपर्यंत जमा करावयाची आहे, याबद्दलही पालकांच्या मनात संभ्रम आहे. पाल्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून या सर्व कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी ग्रामीण भागातील या पालकांना आपली मजुरी चुकवून कागदपत्रे जमा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आधार कार्ड केंद्र केवळ तालुक्याच्याच ठिकाणी असल्याने पालकांना त्यासाठी पाल्यांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. पालकांची अडती बाजू लक्षात घेता काही बाबतीत त्यांची आर्थिक गळचेपी केली जात असल्याचा संतापही पालकांनी व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तगट तपासणी किट नसल्यामुळे २० ते ३० रुपयांमध्ये होणाऱ्या रक्तगट तपासणीसाठी पालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. पालकांची होणारी आर्थिक कोंडी कागदपत्रांसाठी दमछाक पाहता स्टुडंट डाटा बेस प्रणालीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसाठी कॅम्प आयोजित करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

पालकांची होतेय आर्थिक गळचेपी
स्टुडंट डाटा बेस प्रणालीसाठी कागदपत्रे गोळा करताना पालकांना आपली रोजंदारी बुडवून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तेथे कागदपत्रे लवकरात लवकर मिळावी म्हणून काही ठिकाणी १०० ते १५० रुपयांची मागणी केली जात आहे, असे पालकांनी सांगितले.

३१ ऑगस्टपर्यंत द्यावी माहिती
आधार कार्ड ज्या विद्यार्थ्यांकडे आहेत, त्यांनीच आधार नंबर द्यावा. ज्यांच्याकडे नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही. आधार कार्ड नंबर रक्तगट याची माहिती पालकांनी ३१ ऑगस्टपर्यंत द्यावी. इर्शाद खान, गटशिक्षणािधकारी,चांदूर बाजार.

उपक्रम योग्य,पण त्रासदायक
शिक्षण विभागाचा उपक्रम जरी योग्य असला, तरी ग्रामीण भागातील पालकांना कागदपत्रे जुळवताना नाहक त्रास होत आहे. यात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे पाल्यासह आम्हा पालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नितीन टाकरखेडे, पालक.
नि:शुल्क कॅम्प घ्यावेत
स्टुडंट डाटा बेस प्रणालीसाठी आवश्यक असणाऱ्या आधार कार्डसाठी शासनाने नि:शुल्क कॅम्प घ्यावेत. जेणेकरून विद्यार्थी पालकांची होणारी दमछाक थांबेल. सद्य:स्थितीत पालकांना यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. श्रीकृष्ण आवारे, सदस्य,ग्रामपंचायत.