आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमित हॉटेलवर महापालिकेचा हातोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वातील जनविकास काँग्रेसचे नगरसेवक नितीन देशमुख यांच्या रंगोली पर्ल या आलिशान हॉटेलचे (नवाथेनगर) अतिक्रमण आज, शनिवारी सकाळी पाडण्यात आले. नवाथे प्लॉट ते महावीरनगरला जोडणाऱ्या ५० फुटांच्या रस्त्यावर सुमारे १५ ते २० फूट अात रंगोली पर्लची भिंत उभारण्यात आली होती. दरम्यान, मनपाच्या या कारवाईमुळे हा रस्ता मोकळा झाला आहे.

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या धाडसी कारवाईची शनिवारी शहरभर चर्चा होती. विशेषत: राजापेठ, महावीरनगर, नवाथेनगर या भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून कारवाईची पाहणी केली. नवाथेनगरच्या भुयारी रेल्वे मार्गालाही या अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण झाला होता. आजच्या कारवाईनंतर हा अडथळा दूर झाला असून, आम रहदारीचा हा रस्ता लवकरच बांधला जाणार आहे.

सुटीच्या दिवशी भल्या पहाटे झालेल्या या कारवाईमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, दस्तुरखुद्द मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार वरिष्ठ पोलिस अधिकारीच घटनास्थळी उपस्थित असल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

नितीन देशमुख नॉट रिचेबल
मनपाने केलेल्या या कारवाईबाबत हॉटेलमालक नगरसेवक नितीन देशमुख यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांचा भ्रमणध्वनी ९८९००९८७८७ वर संपर्क केला असता काही काळ हा फोन व्यग्र होता. त्यानंतर रिंग वाजली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.दरम्यान, हे सर्व बांधकाम मंजूर नकाशात नाही. त्यामुळे कारवाई अटळ आहे. एवढे मात्र निश्चित.

पाचवा मजला अख्खाच अनधिकृत
या हॉटेलचा पाचवा मजला अख्खाच अनधिकृत आहे. या बांधकामाची कोणतीही मंजुरी घेण्यात आली नाही, असे आयुक्तांचे म्हणणे असून, त्याचे क्षेत्रफळ १३५२.४६ चौरस फूट (१२५.६४८ चौरस मीटर) आहे. त्यामुळे अमरावती मनपा क्षेत्रातील सर्व्हे नं. ६७, भूखंड क्रमांक ८/४ वरील रंगोली पर्ल या हॉटेलचे बांधकाम अनधिकृत असल्याचा ठपका मनपा प्रशासनाने ठेवला आहे.

प्रत्येक माळ्यावर बेकायदा बांधकाम
रंगोली पर्लच्या प्रत्येक माळ्यावर हजारो फुटांचे बेकायदा बांधकाम असचे आयुक्तांनी जारी केलेल्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. तळमजल्यावर मंजूर नकाशाशिवाय १८६७.२९ चौरस फूट अनधिकृत बांधकाम केले असून, ६०८.९४ चौरस फुटांचे बेकायदा शेडही उभारले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या चौथ्या माळ्यावरसुद्धा बाल्कनी झाकून पॅसेजमध्ये अतिरिक्त बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे.
हाॅटेलचे अतिक्रमण हटवल्यानंतर नवाथे प्लॉटला महावीरनगरशी जोडणारा रस्ता असा खुला झाला आहे.