आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याची अफवा, मात्र निघाला तडस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमील काॅलनी येथे बेशुद्ध केलेले तडस. - Divya Marathi
जमील काॅलनी येथे बेशुद्ध केलेले तडस.
अमरावती - नागपुरीगेट ते वलगाव मार्गावरील जमील कॉलनीतील नालीत रविवार, २६ जुलैला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास तडस घुसला. दरम्यान, नालीत बिबट घुसल्याची अफवा परिसरात पसरल्याने प्रचंड गोंधळ उडाला. हजारो नागरिक गोळा होऊन वन विभागाची मदत चमू उशिरा पोहोचल्याने काही काळ नागरिक पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. दुपारी एक वाजताच्या सुमारास तडसाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
नागपुरी गेट ते वलगाव मार्गावर मिठाच्या कारखान्यानजीक जमील कॉलनीतील एका नालीत सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास बिबट्यासारखे जनावर घुसल्याचे काही नागरिकांना द‍िसले. दरम्यान, परिसरात बिबट घुसल्याची अफवा पसरल्याने हजारो नागरिक गोळा झाले. जमील कॉलनीतील या नालीवर अंदाजे पन्नास फूट लांबीचे रपटे असल्यामुळे नालीत अंधार होता. त्यामुळे नालीत घुसलेले जनावर बिबट आहे की, अन्य कोणते याबाबत संभ्रम होता. त्यामुळे परिसरात बिबट घुसल्याचीच अफवा पसरली. हजारो नागरिकांचा जमाव गोळा झाला. याबाबत नागरिकांनी सकाळीच पोलिस वन विभागाला माहिती द‍िली. त्यामुळे पोलिसांची कुमकही पोहोचली. दरम्यान, वन विभागाची मदत चमू तब्बल तीन-चार तास उशिरा पोहोचल्याने घटनास्थळी काही काळ तणाव न‍िर्माण झाला होता. दरम्यान, वन्यजीव प्रेमींची चमूही तातडीने तासाभरात पोहोचली. वन्यजीवप्रेमींनी नालीतील बिबट नसून तडस असल्याचे सांगितल्याने तणाव निवळला. दुपारी एक वाजताच्या सुमारास वन विभागाच्या चमूने तडसाला ‘ट्रॅक्युलाइजर गन’ने बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्याला बाहेर काढून वडाळी येथील रोपवाटिकेत उपचारासाठी नेण्यात आले. तडसाला बाहेर काढण्यासाठी यादव तरटे, अंगद देशमुख, श्रावण देशमुख, निशांत बनसोड, गौरव कडू, मंगेश डाखोरे, हिमांशू कडू, अमोल गावनेर आदी वन्यजीवप्रेमींनी मोलाची मदत केली.
हात हलवत आली ‘रेस्क्यू टीम’
बिबट घुसल्याची माहिती वन विभागाला म‍िळाल्यानंतर वन विभागाची प्रशिक्षित ‘रेस्क्यू टीम’ तब्बल तीन चार तास उशिरा पोहोचली. त्यातच सिव्हिल ड्रेसवर असलेल्या या आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला बघ्यांचीच भूमिका घेतली. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. या चमूने सोबत पिंजरा, जाळे आदी कोणतेच साहित्य आणल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला.