आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या १३ कोटींचा प्रकल्प पोहोचला १,६०० कोटींवर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुमारे ५० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जिल्ह्यातील अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाची अद्ययावत किंमत १६४३ कोटी झाली आहे. सुरुवातीला १९६३ मध्ये केवळ १३ कोटींचे बजेट असलेला हा प्रकल्प शंभर टक्के पूर्ण झाला असला तरी या प्रकल्पाचा बांधकाम खर्च १२५ पट वाढल्याचे वास्तव विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या अहवालातून उघड झाले आहे. अद्यापही प्रकल्पाच्या पाटचऱ्या दुरुस्ती आणि वितरिकांचे बांधकाम सुरूच आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत १२०० कोटींचा खर्च केला आहे. तरीही, बांधकाम आराखड्यानुसार अप्पर वर्धा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अद्यापही सुमारे १५० कोटींची आवश्यकता असल्याचेच अहवालात नमूद केले आहे. यामुळे अद्यापही बांधकामाधीन अवस्थेत असलेल्या या प्रकल्पाच्या गुणवत्तेविषयी आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. २० वर्षांपूर्वीच या प्रकल्पातून सिंचनाची सुविधा निर्माण केली होती. या प्रकल्पावर अद्यापही सक्षम पाणी वापर संस्था कार्यान्वित झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

देखभालदुरुस्तीकरिता निधी नाही
अप्परवर्धा प्रकल्पाअंतर्गत बांधकामाधीन असलेल्या गुरुकुंज उपसा जलसिंचनयोजना आणि पाथरगाव उपसा सिंचन योजना या दोन्ही योजनेचा खर्च अप्पर वर्धा प्रकल्पाच्या अनुदानातूनच करावा लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील पाच वर्षांमध्ये सरासरी ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने अद्यापही हा प्रकल्प सिंचन व्यवस्थापनाखाली आलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पाला देखभाल दुरुस्ती निधी मिळत नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता अद्यापही १५० कोटींची गरज आहे.