आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हा येथे रंगला रिंगण दिंडी सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - टाळ..मृदंग... विठ्ठलनामाच्या गजरात अवघी कुऱ्हा नगरी दुमदुमून गेली. औचित्य होते कार्तिक महोत्सवानिमित्त पायदळ रिंगण दिंडी साेहळ्याचे. डोळ्यात साठवून ठेवणारा हा सोहळा बुधवारी (दि. २५) कुऱ्हा येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात अन् आनंदात पार पडला.
संपूर्ण मैदान तोरण पताकांनी सजवण्यात आले होते. रुक्मिणीच्या प्रतिमेला एकामागून एक येणाऱ्या दिंड्यांनी रिंगण घातले. ५५ दिंड्या या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रत्यक्ष पांडुरंग या दिवशी येथे मुक्कामाला असतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने लाखो भाविक येथे हजेरी लावतात. रुक्मिणीच्या प्रतिमेला रिंगण घालून पायदळ दिंड्या श्री क्षेत्र कौंडण्यपूरकडे रवाना झाल्यात. टाळ, मृदंगाच्या गजरात भाविकांसह अवघी कुऱ्हा नगरी दुमदुमूुन गेली होती. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

यांची लाभली उपस्थिती : रिंगणदिंडी सोहळ्याला रंगराव ठापरे, आमदार यशोमती ठाकूर, सुधीर दिवे, माजी आमदार साहेबराव तट्टे, दिलीप निंभाेरकर, किरण पातूरकर, शिवराय कुळकर्णी, मंगेश भगोले, लुकेश केने, उज्ज्वला पांडव, दिलीप काळपांडे, सदानंद साधू, नामदेव अमळकार, सरपंच विजय नहाटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

कौंडिण्यपुरात आज होणार शासकीय महापूजा
गुरुवारी(दि. २६) सकाळी सहा वाजता शासकीय महापूजेला सुरुवात होईल. गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम येथे राबवण्यात येत आहे. महापूजेला जिल्हाधिकारी किरण गित्ते, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, पालकमंत्री प्रवीण पोटे, तिवसाचे तहसीलदार विजय लोखंडे, गटविकास अधिकारी गिरीश धायगुडे आदींची उपस्थिती राहील