आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahaphil Reached The Amount Of A Fine House Savva Crore

‘महफील’च्या दंडाची रक्कम पोहोचली सव्वा कोटींच्या घरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉटेल ग्रँड महफील - Divya Marathi
हॉटेल ग्रँड महफील
अमरावती- परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याप्रकरणी कॅम्पस्थत हॉटेल ग्रँड महफील महफील इन या जुळ्या इमारतीला मालमत्ता करापोटी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावतीच्या आतापर्यंतच्या इतिहासात दंडाची ही सर्वात मोठी रक्कम असून, महफीलच्या संचालकांनी सुमारे ५० हजार चौरस फूट अतिरिक्त बांधकाम केल्याचे मनपाच्या अहवालात नमूद आहे.

बांधकामाची परवानगी घेतली. परंतु, मंजूर नकाशाऐवजी जादा बांधकाम केले, अशी अनेक प्रकरणे बाहेर आल्यानंतर मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ग्रँड महफील, हॉटेल रामगिरी, ईगल रेस्टारंट, मुन्शी कॉम्प्लेक्स, जे अँड डी मॉलसह अनेक बड्या इमारतींचे मोजमाप घेतले. त्यातील अनियमिततांवर बोट ठेवून आता प्रत्येक इमारतींना कर दंडाच्या नोटीस देणे सुरू झाले आहे.

पहिल्या टप्प्यात र्इगल रेस्टारंट हॉटेल रामगिरीला वाढीव कर आणि दंडाची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर हळूहळू इतरांची प्रकरणे निस्तारणे सुरू आहे. याच शृंखलेत आज ग्रँड महफील महफील इन या जुळ्या इमारतीला नोटीस दिली गेली. शहरातील एकमेव मोठे हॉटेल म्हणून ख्यात असलेल्या ग्रँड महफील महफील इनने सुमारे ५० हजार चौरस फुटांचे अतिरिक्त बांधकाम केल्याचे मोजमापानंतर स्पष्ट झाले आहे.

मनपाच्या अहवालानुसार महफील इनच्या बांधकामासाठीची परवानगी १९९३ साली घेतली गेली. त्यानंतर दहा वर्षांनी ग्रँड महफीलच्या बांधकाम परवानगीची फाइल मनपा प्रशासनाने संमत केली. मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम म्हणून मनपाने या जुळ्या इमारतीवर करही लावला. कराची ही रक्कम वार्षिक १० लाख रुपयांच्या आसपास आहे. मात्र, प्रत्यक्ष बांधकाम अधिक असल्यामुळे येथून पुढे ही रक्कमही वाढणार आहे.

पुढे काय होणार?
कर परवानगी शुल्क लागणार वेगळे
बेकायदाबांधकामासाठी महफीलला वाढीव कर तर भरावाच लागेल. याशिवाय त्यातील नियमानुकूल करून घ्याव्या लागणाऱ्या बांधकामाची परवानगीही घ्यावी लागेल. त्यासाठीच्या विकास शुल्कापोटी किंमान ४० लाख भरावे लागणार असल्याची माहिती आहे. याशिवाय बांधकामासाठीचा मालमत्ता करही इमारतधारकाला भरावा लागेल.

आजपासून ‘गौरी इन’चे मोजमाप , तयारी पूर्ण
बेकायदेशीरबांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात सुरू झालेल्या मोहिमेचा भाग म्हणून शुक्रवारी रहाटगावनजीकच्या ‘हॉटेल गौरी इन’चे मोजमाप सुरू केले जाणार आहे. मनपा प्रशासनाने तशी तयारी केली असून, मोजमापअंती येथील बेकायदा बांधकामही उघड होणार आहे. त्यानंतर मनपाचे मोजणीचक्र शहरातील इतर बड्या इमारतींकडे वळवले जाईल.

व्हीव्हीआयपींचा येथे असतो मुक्काम
कॅम्पस्थतग्रँड महफील हे शहरातील मोठे हॉटेल आहे. निवडणूक आचारसंहितेच्या काळात बहुतेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती याच हॉटेलची निवड करतात. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख ,उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांचा येथे मुक्काम राहिला आहे.

दंडाची रक्कम मान्य नसल्यास संबंधित हॉटेलमालक आयुक्तांच्या दालनात अपील करू शकतात. याच काळात ०.३ या वाढीव एफएसआयनुसार पात्र असलेल्या बांधकामाला नियमानुकूल करण्यासाठी त्यांना परवानगीही मागता येईल. त्यानंतर उरलेले बांधकाम मात्र पाडावे लागेल. नाहीतर मनपातर्फे ते पाडले जाईल. -सुरेंद्र कांबळे,सहायक संचालक, नगररचना विभाग, मनपा.
हॉटेल ग्रँड महफीलचा दर्शनी भाग असा आहे