आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसुती वार्डत महिलांची गैरसोय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसुतीसाठी आणखी काही दिवस शिल्लक असल्याचे सांगितले होते. मात्र शुक्रवारी (दि. २४) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास सदर महिलेची वार्डमधील पलंगावरच प्रसुती झाल्याचा आरोप प्रसूत महिलेच्या वडिलांनी केला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे मात्र अनभिज्ञ होते.
जयश्री उमेश निस्ताने (२२ रा. पोरगव्हाण) असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. जयश्री यांना दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. जयश्री यांची तपासणी केल्यानंतर प्रसुतीसाठी काही दिवस वेळ असल्याचे डाॅक्टरांनी सांिगतले.मात्र शुक्रवारी रात्री अचानकपणे जयश्री यांना प्रसुती वेदना व्हायला लागल्या. त्यावेळी सोबत असलेल्या त्यांच्या आईने उपस्थित यंत्रणेला सांगितले मात्र कोणीही फारसे गांभिर्यान घेतले नाही, असाही आरोप जयश्री यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे वार्ड मधील ज्या पलंगावर त्यांना ठेवण्यात आले होते, त्याच पलंगावर त्यांची प्रसुती झाली, असे जयश्री यांचे वडील भागवतराव राजूरकर यांनी सांगितले. प्रसुती झाल्यानंतर काही वेळाने उपस्थित वैद्यकीय यंत्रणेने जयश्री यांच्यावर पुढील उपचार केले. आता मात्र बाळ बाळंतीन सुखरूप आहे. हा प्रकार धक्कादायक असून रुग्णांच्या जीवासोबत एकप्रकारे खेळच आहे. यापुढे कोणत्याही रुग्णांसोबत असा खेळ करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हा तर रुग्णाच्या जीवाशी खेळच
मुलीलाप्रसुतीसाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली. प्रसुतीसाठी आणखी काही दिवस उशीर असल्याचे सांगितले. मात्र शुक्रवारी रात्री अचानकपणे तिला त्रास झाला. त्यावेळी उपस्थित वैद्यकीय यंत्रणेला कळवूनही त्यांनी गांभिर्याने घेतले नाही, त्यादरम्यान पलंगावरच प्रसुती झाली. रुग्णालयात अशा प्रकारे अव्यवस्था असल्यामुळे रुग्णाच्या जीवाशी हा खेळ झाला असल्याचा आरोप जयश्रीचे वडील भागवतराव राजूरकर यांनी केला आहे.

घटनेची माहिती नाही
सदरप्रकरणाबद्दल आपल्याला माहिती नाही किंवा कोणीही सांगितले नाही. मात्र असे झाले असेल तर हा गंभीर प्रकार असून, या संदर्भात चौकशी केली जाईल. डॉ.दिलीप जाणे, अधिष्ठाता,पीडीएमसी,अमरावती.