आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिट्टी खदानमध्ये युवकाचा मृतदेह; खून की आत्महत्या?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगाव माहोरे मार्गावरील खदानमध्ये मंगळवारी (दि. १८) दुपारच्या वेळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगावपेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. हा मृत्यू संशयास्पद प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अमरावती -नागपूर महामार्गावर रहाटगावपासून वडगावला जाणाऱ्या मार्गांवर अनेक गिट्टी खदान आहेत. या खदानीमुळे या परिसरात अनेक मोठ मोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये तलावासारखे पाणी साचते. मंगळवारी दुपारी महामार्गापासून अंदाजे किमी अंतरावर असलेल्या एका खड्ड्यामध्ये एक मृतदेह पाण्यावर तरंगताना गावकऱ्यांना आढळून आला. गावकऱ्यांनी ही माहिती वडगावचे पोलिस पाटील राजेश भोगे यांना दिली. भोगे यांनी नांदगावपेठ पोलिसांना याबाबत कळवले. माहिती मिळताच नांदगावपेठचे ठाणेदार अनिल किनगे यांच्यासह ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पाण्यातील मृतदेह बाहेर काढला.
सदर मृतदेह पाण्यात असल्यामुळे फुगला आहे. त्यामुळे शरीरावर व्रण आहे किंवा नाही, हे दिसत नाही. त्याच्या डाव्या हातावर बदाम आकारात इंग्रजीमध्ये खाली वर 'एस' हे अक्षर गोंदलेले आहे. तसेच गळ्यात माळ आहे. त्याचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असावे. त्यांच्या अंगावर भुरकट रंगाचा फुल बाहीचा शर्ट काळसर रंगाचा पॅन्ट आहे. तसेच मृतदेह असलेल्या पाण्यापासून बाजूला एका ठिकाणी रक्त दोन चप्पल मिळून आल्या आहेत. एकंदरीत प्रथमदर्शनी हा संशयास्पद मृत्यू असल्याचे घटनास्थळावर पोलिसांनी सांगितले. मात्र, मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्यामुळे तसेच शवविच्छेदन झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. पोलिसांनी श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सदर श्वान राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचला होता.

सर्वपोलिस ठाण्यांना दिली माहिती : सदरमृतदेहाची मंगळवारी रात्रीपर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती. त्यामुळे नांदगावपेठ पोलिसांनी पोलिस आयुक्तालयातील सर्व ठाण्यांसह जिल्हाभरातील सर्व ठाण्यांना माहिती दिली आहे. या व्यक्तीसंदर्भात माहिती असल्यास शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्ष किंवा नांदगावपेठ ठाण्यासोबत संपर्क साधावा.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण पुढे येईल
वडगावमार्गावरील खदानच्या खड्ड्यात पाण्यात तरंगताना मृतदेह मिळून आला. प्रथमदर्शनी हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय मृत्यूचे कारण पुढे येणार नाही. सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यासाठी आम्ही शहरांसह जिल्ह्यातील सर्व ठाण्यांना माहिती दिली आहे. अनिलकिनगे, ठाणेदार, नांदगावपेठ.
खदानमध्ये आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करताना पोलिस उपस्थित जनसमुदाय.