आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कडू कडाडले, वीज अभियंता बिथरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - शेतकऱ्यांच्याविजेबाबत समस्या सोडवण्यासाठी आयोजित वीज ग्राहक तक्रार मेळाव्यात अभियंता कर्मचाऱ्यांबाबत आमदार बच्चू कडू यांनी वापरलेल्या भाषेबाबत अभियंता संघटनेच्या (एसईए) वतीने मंगळवारी (दि. २१) निषेध करण्यात आला.

पावसाने दडी मारल्यामुळे पिके जगवण्यासाठी बागायत शेतकऱ्यांना विजेबाबत अनंत अडचणी येत असल्यामुळे पिके जगवणे अत्यंत जीवघेणे झाले आहे. दरम्यान, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी रविवारी परतवाडा येथील वाघमाता संस्थानात वीज ग्राहक तक्रार मेळाव्याचे आयोजन केले होते.

या मेळाव्याला कार्यकारी अभियंत्यासह २५ ते ३० सहायक अभियंता कर्मचाऱ्यांसह शेतकरीही उपस्थित होते. या मेळाव्यात कडू यांनी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या जीवघेण्या समस्या मांडल्या. यासोबत कडू यांनी असंसदीय भाषा वापरून वीज अधिकाऱ्यांची सणसणीत कानउघाडणी केली. या वक्तव्यावर सभेत अधिकाऱ्यांनी कोणताच निषेध करता मेळाव्याचे कामकाज पूर्ण केले. दरम्यान, आज कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयासमोर येऊन अभियंता संघटनेच्या वतीने कडू यांचा निषेध करण्यात आला.

यानंतर कडू यांनी बोलावलेल्या सभेवर बहिष्कार करीत सुरक्षेची हमी देण्याची मागणी अभियंता संघटनेच्या वतीने करण्यात आली. सबऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष चेतन कडू म्हणाले, आमदार कडू यांनी पवित्र ठिकाणी असंसदीय भाषेचा वापर करून अभियंत्यांसोबत गैरवर्तन केले. शासनाचे प्रतिनिधी असताना समान न्यायाऐवजी ग्राहकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण करून धमकी देणे निंदनीय आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. या वेळी संघटनेचे संदीप गुजर, मंगल ठाकूर, गोकूल ठाकरे, संजय कुटे, फुलचंद टेंभेकर, जितेंद्र वाघमारे, विनय तायडे, मोहनकुमार चांदुरे, महेश कोकाटे आदी उपस्थित होते.

चारतालुक्यांतही निषेध :आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याचे वीज कंपनीच्या अभियंत्यांमध्ये आज तीव्र पडसाद उमटले. अंजनगावसुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, अचलपूर तालुक्यातील वीज कंपनीच्या अभियंत्यांकडून या घटनेबाबत निषेध करण्यात आला.

धमकीमुळे खचले अभियंत्यांचे मनोधैर्य
जनसेवकांनी समन्वयाने समस्या निकाली काढणे आवश्यक आहे. कडू यांच्या धमकीमुळे अभियंत्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे काम कसे करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय कुटे, सहायक अभियंता, अचलपूर.

आमदारांची दादागिरीची भाषा
आमदारकडू नेहमीच अरेरावीची भाषा बोलून कार्यकर्त्यांवर छाप टाकण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अभियंत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कडू नेहमीच जनसेवकाऐवजी दादागिरीची भाषा करीत असल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. एम.एम. टेंभेकर, उपसहायक अभियंता, अचलपूर

असे अपमानित करणे योग्य नाही
आम्हीहीशेतकऱ्यांची मुले आहोत. शासकीयस्तरावर अनेक समस्या आहेत. अशा पद्धतीने अपमानित करून समस्या सुटत नाहीत. याकडे लोकप्रतिनिधींनी तसेच शासनानेही लक्ष द्यावे. चेतन कडू, एसईए संघटना, विभागीय अध्यक्ष

भ्रष्ट अधिकाऱ्यांची कदापि गय नाही
भ्रष्टअधिकारी असेल तर त्यांना निश्चितच शेण खाऊ घालू. जिथे दहा जोडण्या आवश्यक आहे, तेथे या अभियंत्यांनी वीस जोडण्या देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. वीज कंपनीचे अभियंते निषेध करत असतील तर यापुढे अभियंत्यांच्या कार्यालयातच सभा घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू बच्चू कडू, आमदार.