आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन : धनगर मेंढपाळ कुटुंबांनी रस्त्यावरच थाटला संसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात मेंढपाळ धनगर कुटुंबातील सदस्यांनी एल्गार पुकारला असून, वनांमध्ये राहणाऱ्या या कुटुंबांनी ऐन रस्त्यावरच आपला संसार थाटला आहे. वंशपारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळ धनगरांना वनहक्क चराई पास द्या अन्यथा नक्षलवादी बनण्यास परवानगी द्या, अशी मागणी या कुटुंबातील सदस्यांनी शासनाकडे केली आहे.

वन विभागाकडून मेंढ्यांना त्रास देणे बंद करावे, वन विभागाच्या वनक्षेत्रात वंश पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळ धनगरांना चराई क्षेत्र राखीव करून चराई पास चूल पास देण्यात यावी आणि वनपरिक्षेत्रामध्ये प्रकल्प होत असल्यास त्या ठिकाणी असलेल्या मेंढपाळ धनगरांची पर्यायी व्यवस्था किंवा पुनर्वसन केले जावे, या मागणीसाठी विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचच्या वतीने जिल्हा कचेरीवर सोमवारी (दि.१०) मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा कचेरीसमोर बेमुदत राहुटी आंदोलन करण्यात येणार आहे. विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक संतोष महात्मे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, सकाळी ११ वाजता सायन्स्कोर येथून हा मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु, मधातच दमदार पावसाने हजेरी लावल्याने दुपारी एकच्या पुढे हा मोर्चा जिल्हा कचेरीच्या मार्गाने निघाला. सायन्सस्कोरवरून पुढे मालटेकडी, गर्ल्स हायस्कूल चौकातून जिल्हा कचेरीवर हा मोर्चा नेण्यात आला. तत्पूर्वी पोलिसांचा चोख बंदोबस्त जिल्हाधिकारी परिसरात तैनात होता. पोलिसांनी काही अंतरावरच बॅरिकेट्स लावून आंदोलकांना थांबवले. त्या ठिकाणी मेंढपाळ धनगर कुटुंबांनी सोबत आणलेल्या साधन सामग्रीतून रस्त्यावरच राहुटी उभारली. विभागातील पाचही जिल्ह्यातून आलेले मेंढपाळ धनगर कुटुंबातील सदस्य मोर्चात सहभागी झाले होते. मोठ्या टेम्पोमध्ये आपला संसार सोबत घेऊन हे सदस्य मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, राहुटी उभारण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी विकास मंचचे जानराव कोकरे, राजाभाऊ गंधे, अशोक गंधे, शरद शिंदे, रतन यमगर, हरिभाऊ शिंदे, धोंडीराम टाके, मधुकर बिचुकले, रामभाऊ जुमडे, श्रीपाल पाल, रामकृष्ण गावनेर, अवकाश बोरसे, संगीता ढोके, नीलेश मस्के, सचिन ढगे, श्याम बोबडे, उमेश घुरडे तथा विभागातून आलेले मेंढपाळ धनगर समाजाचे शेकडो कुटुंबातील सदस्य राहुटी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त
जमावाला नियंत्रित करण्यासाठी या वेळी जिल्हा कचेरीसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. गाडगेनगर सिटी कोतवाली असे दोन्ही ठाण्याचे एसीपी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक पोलिस कर्मचारी हजर होते. शहर पोलिसांसोबतच वाहतूक शाखेचे पोलिस पथकही वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी उपस्थित होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होता. मात्र, आंदोलकांनी शांत मार्गाने आंदोलन करून पोलिसांना सहकार्य केले.
अन्यथा बेमुदत राहुटी आंदोलनाचा इशारा
मागण्यांसाठी धनगर बांधवांनी ऐन रस्त्यावरच राहुटी उभारली. बेमुदत राहुटी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणीच दुपारी चहापाणीसाठी चूल पेटवण्यात आली होती. मागण्या पूर्ण होईपर्यंत याच ठिकाणी स्वयंपाक करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजबांधवांनी सोबतच चूल पेटवण्यासाठी लाकडे शेणाच्या गवऱ्या, झोपेसाठी लागणारे साहित्य, तथा स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारे सर्वच साधन सामग्री सोबत आणली आहे. दरम्यान, सोबत आलेल्या धनगर महिलांनी डोक्यावर गुंड घेऊन पाणी आणतानाचे चित्र या वेळी बघायला मिळाले.
एकीकडील मार्ग झाला बंद
गर्ल्स हायस्कूल चौक ते विद्यापीठकडे जाणारा मार्ग हा बंद करण्यात आला होता. त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहतूक वळवण्यात आली होती. ऐन रस्त्यावरच राहुटी उभारण्यात आल्याने या वाहतुकीत बदल करण्यात आला होता. विभागातून आलेल्या मेंढपाल धनगर बांधवांनी रस्त्यावर आपला निवारा थाटला होता. जिल्हाधिकारी कार्यालयापासून साधारणत: १०० फुटावर या राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. जवळपास शंभराहून अधिक मेंढपाळ धनगर समाजबांधव राहुटी आंदोलनात सहभागी झाले आहे.