आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एमपीएड'च्या परीक्षा ‘एनसीटीई’नुसार होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शारीरिक शिक्षण विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची (एमपीएड) परीक्षा एनसीटीई (नॅशनल कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) ने दिलेल्या निर्देशानुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहराज्यमंत्री तथा विद्यापीठ अधिसभेचे सदस्य प्रा. रणजीत पाटील यांनी अलिकडेच या विषयात कुलगुरु डॉ. मोहन खेडकर यांना पत्र लिहिले होते.

एमपीएडचा अभ्यासक्रम बदलल्याचे पत्र एनसीटीईने गतवर्षीच विद्यापीठाला पाठविले होते. त्यानुसार शिकवणेही सुरु झाले होते. मात्र तीन महिन्याचा कालखंड लोटून परीक्षेचे दिवस जवळ आले तरीही सिलॅबस प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. शेवटी जुन्याच अभ्यासक्रमानुसार परीक्षा होईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. हा गुंता सुटावा म्हणून अलिकडेच विद्यार्थ्यांनी रणजीत पाटील यांच्याकडे तक्रार-वजा-निवेदन दिले होते. त्याला अनुसरुन त्यांनी कुलगुरु डॉ. मोहन खेडकर यांच्याशी पत्रव्यवहार केला.

या पत्रव्यवहारानुसार एनसीटीईने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच हा अभ्यासक्रम पुढे न्यावयाचा असून परीक्षा त्याच तत्वानुसार घेतल्या जाणार आहेत. दरम्यान मंत्री महोदयांच्या पत्रव्यवहारानंतर विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत विद्यार्थी-शिक्षकांनी केले असून त्यासाठी संबंधितांना धन्यवादही दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही
^अभ्यासक्रमा मधील अदला-बदलीमुळे विद्यार्थ्यांचे अहित होणार नाही, याची काळजी विद्यापीठाने घेतली आहे. एनसीटीईनुसार परीक्षा घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशच रद्द होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे वेळ पडल्यास परीक्षा पुढे ढकलल्या जातील, परंतु त्या एनसीटीईनुसारच घ्यायच्या, असे विद्यापीठाने आधीच ठरवले आहे.'' डॉ.अजय देशमुख, कुलसचिव, सं.गा.बा. अमरावती विद्यापीठ, अमरावती.