आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकामातून अधिकारी मात्र मोकळेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अनधिकृत बांधकाम केले म्हणून नागरिकांवर कारवाई करता तर मग ते होताना डोळेझाक करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही, असा रोखठोक सवाल आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी विचारला आहे. महापालिकेशी संबंधित विविध विषयांबाबत सोमवारी सायंकाळी आमदार महोदयांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कक्षात बैठक घेतली. मनपातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह माजी महापौर मिलिंद चिमोटे सर्व विभागप्रमुखही या बैठकीला उपस्थित होते. परवानगीपेक्षा जादा बांधकाम करणाऱ्यांना मनपा प्रशासनाने बजावलेल्या दंड भरण्याबाबतच्या नोटीसवरून या बैठकीत चांगलेच रणकंदन झाले. सर्वप्रथम मिलिंद चिमोटे यांनी या मुद्द्याला तोंड फोडले. मनपाचे कोणतेही धोरण ठरले नसताना अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणे गैर आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

त्यामुळे शहरात तोडफोडीची कारवाई अयोग्य असून, मनपाने त्यात भेदभाव केल्याचा आरोप होता. अनधिकृत बांधकामांबद्दल कारवाई करताना कायद्याने घरगुती, वाणिज्यिक व्यावसायिक असा कोणताही भेदभाव करता येत नाही. मात्र, मनपाच्या कारवाईतून तसे प्रतिपादित झाले असल्याने शासन किंवा मनपा स्तरावरील धोरण निश्चित होईपर्यंत कारवाई थांबवावी, अशी त्यांची मागणी होती. हाच धागा पकडून पुढे आमदार डॉ. देशमुख यांनीही याबाबत प्रशासनाला विचारणा केली. बैठकीला स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेते बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर, गटनेते प्रकाश बनसोड संजय अग्रवाल, झोन सभापती चंदुमल बिल्दानी, तुषार भारतीय, दिगंबर डहाके अजय गोंडाणे, प्रदीप दंदे, बाळासाहेब भुयार, कुसुम साहू, मंजूषा जाधव, कांचन उपाध्याय, छाया अंबाडकर, प्रा. सुजाता झाडे, प्रा. प्रशांत वानखडे,चंदन पाटील, राहुल ओगले, योगेश पिठे, नरेंद्र वानखडे प्रणाली घोंगे, जीवन सदार, अनंत पोतदार, सुरेंद्र कांबळे, महेश देशमुख हजर होते.

भुयारी गटार योजनेचा मुद्दा सात दिवसांमध्ये सोडवा
भुयारी गटार योजनेच्या कामासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संबंधित नळजोडणीचा मुद्दाही या बैठकीत चर्चिला गेला. मनपा, मजीप्रा कंत्राटदार या तिघांनी एकत्र बसून सात दिवसांचे आत भुयारी गटार योजनेचा मुद्दा सोडवावा, असे आमदार महोदयांचे आदेश आहेत. याशिवाय नळजोडणीची उर्वरित कामे त्वरेने पूर्ण करण्याबाबतही त्यांनी लवचीक धोरण अवलंबण्याचे निर्देश दिले.

घरकुल, शौचालये, वृक्षारोपण अन् स्मार्ट सिटी
प्रारंभी स्मार्ट सिटीचा प्रवास कसा चाललाय, हे आमदारांनी जाणून घेतले. त्यानंतर रमाई आवास योजनेंतर्गत बांधावयाची घरे, सर्व जाती-धर्मांसाठी लागू असलेली वैयक्तिक शौचालयाची योजना वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन याबाबत मनपाची आखणीही आमदारांनी जाणून घेतली. घरकुल आणि वैयक्तिक शौचालय योजनेचे काम पुढे जावे, यासाठी उपाययोजना करण्याची सूचनाही केली.
महापालिकेतील विविध मुद्द्यांची मांडणी करताना आमदार डॉ. सुनील देशमुख, बाजूला महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार पदाधिकारी-अधिकारी.