आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरामध्ये एकाच दिवशी ३१.४९ लाखांची करवसुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागरिकांच्या सोयीसाठी त्यांच्या दारावरुनच करवसुली व्हावी, या उद्देशाने मनपाने शनिवारी शहरामध्ये १८ ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. या शिबिरांमधून एकाच दिवशी ३१ लाख ४९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

मालमत्ता कर अदा करण्याची मनपाने आखून दिलेली तारीख ३१ डिसेंबर आहे. या मुदतीत ही रक्कम अदा केल्यास संबंधितांना दोन टक्के व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो. तो लागू नये म्हणून मनपा प्रशासनाने ही सोय उपलब्ध करुन दिली आहे. आजच्या पहिल्या दिवशी बहुतेक नागरिकांनी या सोयीचा लाभ घेतला.

झोन क्रमांक एक रामपुरी कॅम्प मधून २० लाख १९ हजार तर झोन क्रमांक चार बडनेरामधून ११ लाख ३० हजार रुपये वसूल केले गेले. रामपुरी कॅम्प भागात दहा ठिकाणी करवसुली शिबिरे आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक शिबिरात दोन करवसुली लिपिक निरीक्षकांना तैनात करण्यात आले होते. तर नागरिकांना या शिबिराची आधीच माहिती व्हावी म्हणून स्वच्छता निरीक्षक, लिपिक मनपा यंत्रणेतील इतर सहकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आलेे. मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्गदर्शनात मुख्य कर मुल्यांकन अधिकारी महेश देशमुख, झोन एकचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, चारचे सहायक आयुक्त योगेश पीठे त्यांच्या अधिनस्थ कार्यरत करवसुली लिपिक आणि कर निरीक्षकांनी या शिबिरांमध्ये नागरिकांकडून रकमा जमा केल्या.

अतिरिक्त बांधकाम आढळलेल्या मालमत्ताधारकांना मनपाने कर रकमेच्या तुलनेत सहापट दंड ठोठावला होता (अर्थात नोटीस दिली होती) मात्र याच काळात झालेल्या आमसभेत मनपा पदाधिकाऱ्यांनी दुप्पटपेक्षा जास्त दंड आकारला जाऊ नये, असा ठराव संमत करुन शासनाकडे पाठवला. ही बाब मनपा प्रशासनाने मान्य केली नाही. दंड आकारणीचा मुद्दा पूर्णत: प्रशासकीय असल्यामुळे ते भूमिकेवर ठाम होते. या मुद्द्यांचाही कर वसुलीवर परिणाम झाला आहे.
‘त्या’नोटीसीचाही परिणाम : मनपाप्रशासनाने मध्यंतरी शहरातील एक-चतुर्थांश मालमत्तांची मोजणी करुन अतिरिक्त बांधकाम केलेल्या इमारतींना दंडाची नोटीस दिली होती. हा दंड कराच्या रकमेला अनुसरुन आकारण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये कर वाढल्याचाच संदेश गेला. परिणामी काही नागरिकांनी त्याविरुद्ध अपिलही केले. परंतु बहुतेक प्रकरणांचा अंतीम निर्णय अद्याप लागला नाही. त्यामुळे नागरिकांनी कर भरणाच थांबवला आहे.

घराजवळच केले शिबिरांचे आयोजन
^करवसुलीसाठी महानगरामध्ये ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेली शिबिरे उद्या, रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीही सुरू राहतील. नागरिकांना हाकेच्या अंतरावरच कर भरता यावा म्हणून त्यांच्या घराजवळच ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. महेश देशमुख, मुख्यकर मूल्यांकन अधिकारी, मनपा. अमरावती.
बातम्या आणखी आहेत...