आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुर्धर फार, सोयी-सुविधांची मारामार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती जिल्ह्यात सुमारे ७०० आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्यस्तरीय धनुर्धर असून, अनेक उदयोन्मुख धनुर्धर येथे घडत आहेत ते केवळ नाममात्र सोयी-सुविधांच्या बळावर. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढील शासनाने १९९८ मध्ये दिलेली २८,००० चौ.मी. जमीन उपलब्ध असताना गेल्या १८ वर्षांपासून ती तशीच पडून आहे. आता तर तेथे अनधिकृत झोपडपट्टीही वसायला लागली आहे. जर तत्काळ या जागेच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली नाही, तर तेलही जाईल अन् तूपही, हाती धुपाटणे येईल. यात सर्वाधिक नुकसान होईल ते अमरावती येथील धनुर्धरांचे.
प्रमोद चांदुरकर, स्वाती बाळापुरे, तुषार शेळके, हृत्विक हातगावकर, भूषण निघोट, पूर्वशा शेंडे, पूजा पल्लीवाल, उन्नती राऊत अशी कितीतरी नावे बोटावर मोजता येतील असे हरहुन्नरी अन् आंतरराष्ट्रीय धनुर्धर आहेत. मात्र, त्यांनी एकतर स्वबळावर किंवा बाहेर जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे यश संपादन केले. त्यामुळे एव्हाना धनुर्धरांची नगरी असा लौकिक या शहराला मिळाला आहे. राज्य संघात सर्वाधिक पदके ही अमरावतीकर खेळाडू मिळवतात. त्यांना तुटपुंज्या सोयींसह जागेमध्ये घडवणारे तज्ज्ञ प्रशिक्षक सदानंद जाधव, गणेश विश्वकर्मा, विकास वानखडे, पवन तांबटही याच शहरातील असून त्यांनीही राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.
प्रमोद चांदुरकर यांनी, तर लिंबा रामसारखा विश्वविजेता धनुर्धर घडवला. असे धनुर्विद्या क्षेत्रातील दिग्गज शहरात असताना येथे अजूनही या खेळासाठी नाव घेता येईल अशा शासकीय सोयी नाहीत. यासाठीही शासनाकडून तत्परतेने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण पूर्वशा शेंडे ही मूळ अमरावतीची असताना तिला आंध्र प्रदेशात प्रशिक्षण घ्यावे लागतेय, भूषण निघोटही डेल्टा अकादमीत प्रशिक्षण घेतोय, तर पूर्वा पल्लीवालसाठी शहरात जागाच उपलब्ध नाहीत. ज्या खेळाडूंची आर्थिक क्षमता नाही त्यांनी मग अंगी कौशल्य असूनही मागेच राहायचे काय?
अमरावतीत शासनाची धनुर्विद्या अकादमी आहे. मात्र, खो-खो या खेळासाठी राखीव असलेल्या मैदानावर हे धनुर्धर सराव करतात. बरे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आवश्यक अंतर मिळेल एवढी जमीन येथे उपलब्ध नाही. बाजूलाच बास्केटबॉल कोर्ट आहे. तेथील खेळाडू याच धनुर्विद्या रेंजवरून ये-जा करतात. एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित हाडेत असून, या प्रश्नाचे उत्तरही शासनालाच द्यावे लागणार आहे.
तीन कोटींचा प्रस्ताव पाठवला : डीएसओ
तत्कालीनक्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी जागेची पाहणी केली. क्रीडा प्रबोधिनीसह अकादमीसाठी स्वतंत्र इमारत असावी यासाठी कोटींचा प्रस्ताव पाठवला. याअंतर्गत स्वतंत्र वसतिगृह, ३०, ५०, ७० मी. अंतराचे आर्चरीचे स्वतंत्र रेंज, ज्युदो हॉल, खानावळ, प्रशासकीय इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे २५ ५० मी. आऊटडोअर शूटिंग रेंज उभारले जाणार आहे.
बाहेर घेताहेत प्रशिक्षण
शहरात धनुर्विद्या खेळासाठी आवश्यक सुविधा नाहीत.त्यामुळे धनुर्धरांना बाहेर जाऊन प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यामुळेच जर येथे अद्ययावत अकादमी तयार झाली, तर खेळाडू प्रशिक्षकांची चांगली सोय होईल. येथील खेळाडूंच्या प्रतिभांना आकार मिळेल. प्रमोदचांदुरकर, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक.
योजना आखणे सुरू आहे
शासनानेधनुर्विद्या प्रबोधिनी अकादमीसाठी दिलेल्या जागेबाबत ठराव झाला आहे. तसेच मनपाच्या नगर रचना विभागाने डीआरही केला आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पक्ष दिले असून, ते योजना आखत आहेत. विकासकामाला लवकरच सुरुवात होईल. डॉ.जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक.