आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-सेना सरकारकडे सत्तेतील वाट्याकरिता आग्रही नाही - महादेव जानकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील सत्तेत वाटा मिळावा, मंत्रिपद मिळावे अथवा महामंडळे मिळावीत अशी कोणत्याही प्रकारे आग्रही मागणी रासपने भाजप-सेना सरकारकडे केली नसल्याचे आमदार महादेव जानकर यांनी गुरुवारी अमरावतीत सांगितले. निवडणुकीपूर्वी रासप, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रिपाइं या चार घटक पक्षांना दिलेली आश्वासने भाजप सरकारने पाळावीत, असे जानकर म्हणाले. संपूर्ण राज्यात रासपने सदस्य नोंदणीच्या माध्यमातून संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील विधानसभेच्या निवडणुकानंतर स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये राज्यात रासपची भूमिका महत्त्वाची ठरेल, एवढे आमदार आम्ही निवडून आणू, असा दावा जानकर यांनी केला. अमरावती येथे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याकरिता गुरुवारी जानकर आले असता त्यांनी विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत बाळासाहेब डोडतले, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

कायदेशीर मार्गाने आरक्षण
धनगरांनाआरक्षण दिले पाहिजे, असे जानकर यांनी सांगितले. मात्र, आदिवासींचे हक्क डावलून आम्ही धनगरांकरिता आरक्षण मागितलेले नाही. आरक्षण मिळण्याकरिता विलंब झाला तरी चालेल, पण राज्यातील भाजप सरकार धनगरांना आरक्षण देईल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. कायदेशीर मार्गाने आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न आहे. मिळालेले आरक्षण टिकले पाहिजे. जेणेकरून धनगरांना आरक्षणाचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मुलांना मदत
विदर्भ,मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, या भागात आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समुपदेशनाच्या कामाला सुरुवात केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी रासपने पुढाकार घेतला आहे. एमपीएससी अथवा यूपीएससीच्या माध्यमातून परीक्षांची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा खर्च रासप करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.