आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर आता गरजूंना मिळेल ऑनलाइन रक्तदाता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रक्तदान हेच जीवनदान आहे. वेळेवर रक्त मिळाले नाही, तर रुग्णाला आपले प्राण गमवावे लागते. अलीकडे दिवसेंदिवस होणारे अपघात आणि इतर आजारांमुळे रक्ताची मागणी वाढली आहे. थॅलेसिमिया, सिकलसेल आजाराच्या रुग्णांना तर वारंवार रक्ताची गरज भासते. परंतु, रक्ताची मागणी जरी वाढली तरी रक्त साठा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. रक्तामुळे कोणाचाही जीव जाणार नाही, रुग्णाला वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शहरातील रुद्राक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. रक्ताची मागणी असलेल्यांना वेळेवर रक्त मिळावे या अनुषंगाने या संस्थेने ऑनलाइन रक्तदात्यांची यादी तयार केली आहे. या यादीत शहरातील २,१०० दाते समाविष्ट करण्यात आले असून, अगदी एका क्लिकवर नागरिकांना घरबसल्या जो रक्तगट हवा आहे, त्या रक्तदात्याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. अगदी वेळेवर ज्याला रक्त हवे आहे, त्याला या रक्तदात्यामुळे रक्त उपलब्ध होणार आहे.
रुद्राक्ष संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्ताची नितांत गरज असलेल्यांसाठी संस्थेने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या वेबसाइटचे लोकार्पण टाऊन हॉल येथे करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बच्चू कडू, आमदार डॉ. सुनील देशमुख, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रयास सेवांकुरचे डॉ. अविनाश सावजी, सिव्हिल सर्जन डॉ. अरुण राऊत वसू महाराज आदी उपस्थित होते. या वेबसाइटचे उद््घाटन काेमल कुंभलवार या युवतीच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कोमल ही मृत्यूशी झुंज देत असून, नव्या पिढीला एक प्रेरणा देण्याचे काम ती करत आहे. या अनुषंगाने या वेबसाइटचे उद््घाटन तिच्या हस्ते करण्यात आले. रुद्राक्ष ही संस्था रक्तदानासाठीच काम करते. यासोबतच रक्तदानाची जनजागृती करणे, शेती उपक्रम, वैद्यकीय तपासणी शिबिर, पाणी वाचवा अभियान, जागो अमरावती जागो मतदान चळवळ, नेत्रदान संकल्प शिबिर असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात. या वेळी संस्थेचे पीयूष मोरे, गौरव हुकूम, निखिल यादव, निखिल काळे, महेंद्र खिरळकर, सुमीत विंचूरकर, श्याम ढोबळे, राहुल सोनपरोते, गौरव वानखडे, अभिजित यादवसह संस्थेचे ४३ सदस्य यासाठी काम करीत आहेत.

खेडेगावात ऑफलाइन सेवा : शहरातीलनेट युजर्स अगदी सहजरीत्या ऑनलाइनवरून या वेबसाइटला भेट देतील. पण, खरी अडचण आहे, ती ग्रामीण भागातील नागरिकांची. छोट्या खेड्यातील नागरिकांना रक्ताची गरज भासल्यास त्यांना नेट वापरणे अडचणीचे ठरणार आहे.
हजार १०० आहेत रक्तदाते

रुद्राक्ष बहुउद्देशीय संस्थेने www.rudrakshabloodhelpline.org ही वेबसाइट सुरू केली आहे, या वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या जो रक्तगट हवा आहे, तो सहज उपलब्ध होईल. जे वारंवार रक्तदान करतात नेहमीच उपयोगी पडतात, अशा २,१०० जणांची संपूर्ण माहिती मोबाइल नंबरसह या वेबसाइटवर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या कुणाला जो रक्तगट हवा असेल त्या रक्तदात्याला संपर्क करून तो रक्त प्राप्त करू शकतो. सर्च ऑप्शनसह या वेबसाइटवर अॅड डोनर असे ऑप्शनही देण्यात आले आहे. एखाद्याला या ग्रुपमध्ये अॅड व्हायचे असेल, तर तो या रक्तदात्याच्या यादीत समाविष्ट होऊ शकतो, असे रुद्राक्षच्या टीमने सांगितले.