आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती आता पर्यटनाच्या नकाशावर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पर्यटन ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या काही बाबींमुळे शहर पर्यटनाच्या नकाशावर आले असून, बुधवार, २५ नोव्हेेंबरपासून जिल्हा प्रशासनातर्फे ‘अमरावती दर्शन’ ही सहल बस सुरू केली जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सहल बस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली असून, ती नियमित होण्याची शक्यता आहे.

या सहलीदरम्यान, अमरावतीचे वैभव असलेल्या विविध सतरा बाबी या विद्यार्थ्यांना दाखवल्या जातील. जिल्हाधिकारी किरण गित्ते महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या वतीने ही योजना आकाराला आली असून, त्यामध्ये महापालिकेचाही मोठा सहभाग आहे. पर्यटन महामंडळाच्या योजनेनुसार २५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीच्या पर्वावर (शाळा-महाविद्यालयांना सुटी असलेला दिवस) पहिली शहर दर्शन बस धावणार आहे. इंग्रजकालीन इमारती असलेले विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, येथील मध्यवर्ती कारागृह, तपोवन, वडाळी तलाव, छत्री तलाव, काला पाणी तलाव, नकोलेट पार्क (नेहरू मैदान), नेटिव्ह जनरल लायब्ररी (नगरवाचनालय), घंटी घड्याळ, गणेश थिएटर (प्रभात टॉकिज), हिंदू हायस्कूल (अॅकेडेमिक / विद्योचित शाळा), हरिश्चंद्र पाटलांचा गणपती व्हिक्टोरिया टेक्निकल इन्स्टिट्यूट (आयटीआय) या स्थळांचा त्यामध्ये समावेश आहे. भविष्यात या स्थळांमध्ये आणखी काही बाबींची वाढ होण्याचीही शक्यता आहे.

या स्थळांचाही व्हावा समावेश
‘अमरावतीदर्शन’मध्ये काही स्थळांचा समावेश केला तरी समग्र दर्शनाच्या दृष्टीने त्यात काही स्थळांची भर टाकणे गरजेचे आहे. यात शहराचा परकोट (जुन्या अमरावतीची संरक्षण भिंत), डॉ. देशमुख स्मृती केंद्र, शिव टेकडी, अंबादेवी एकवीरादेवीचे मंदिर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, माताखिडकी येथील श्रीकृष्ण मंदिराचा समावेश आहे.

वडाळी छत्री तलावाचा पहिला दिवस विनाशुल्क : वडाळीछत्री तलाव ही पर्यटन स्थळे मनपाने खासगीस्तरावर चालवायला दिली आहे. त्यामुळे प्रायोगिकस्तरावर एका दिवसासाठी (२५ नोव्हेेंबर) ही दोन्ही स्थळे अमरावती दर्शन सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती पर्यटन महामंडळाने मनपाला केली होती. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ती मान्य केली आहे.