आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आपला कर आपणच मोजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती मनपा - Divya Marathi
अमरावती मनपा
अमरावती- विना परवानगी किंवा परवानगीपेक्षा जास्त केलेले बांधकाम नियमानुकूल करण्यासाठी सहापट दंड आकारण्याच्या मुद्द्यावर सध्या शहरात रान उठले असतानाच आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सुलभ मार्ग शाेधला आहे. हा नवा मार्ग कर आकारणीच्या नोटीसमधून जाणार असून, नागरिकांना आता घरबसल्या स्वत:च्या इमारतीचा कर मोजता येणार आहे. मुळात नागरिकांना पाठवल्या जाणाऱ्या नोटीसमध्ये इमारतीचा संपूर्ण तपशील लिहिला जाणार असून, त्यातील प्रत्येक गोष्ट स्वयंस्पष्ट राहणार आहे.
नोटीसच्या माध्यमातून मालमत्ता उपयोगात आल्याचे वर्ष, मनपाच्या असेसमेंट रजिस्टरनुसार बांधकामाचे क्षेत्रफळ, मोजणीदरम्यान नोंदलेले क्षेत्रफळ, कर आकारणीयोग्य असलेले अतिरिक्त क्षेत्र, वस्ती बांधकामाचा प्रकार (जसे अ, ब, क), मूल्यांकनाचा प्रती चौरसफूट दर, त्यानुसार तयार होणारे वार्षिक कर योग्य मूल्य, त्यावरून दंड लावण्यासाठी त्याची सहापट होणारी रक्कम, मालमत्तेचा निवासी किंवा गैरनिवासी वापर आदी बाबी इमारत धारकाकडून भरून घेतल्या जातील.

या संपूर्ण माहितीच्या आधारे मनपा कर आकारणी करणार असून, कराचा दर सूत्र थेट इमारतधारकाला माहीत करून दिले जाणार असल्याने संबंधित इमारत धारकही स्वत:च स्वत:चा कर मोजणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने कर खूप वाढवला, तो सहापट लावला. एवढा लागायलाच नको होता. फार लावला गेला आदी प्रश्नांना आपोआपच विराम लागणार आहे. नागरिक स्वत:च स्वत:चा कर मोजणार असल्याने मनपाची आकारणी नागरिकांची आकारणी याची पडताळणीही केली जाणार आहे.

नागरिकांची ओरड होणार कमी
नोटीसस्वयंपूर्ण असल्यास नागरिकांकडून ओरड होण्याचे कारणच उदृभवत नाही. मुळात सहापट दंडाची नोटीस पाठवण्यापूर्वीच हा मुद्दा लक्षात घेऊन तशा नोटीस त्यांना पाठवायला पाहिजे होत्या. मात्र, संबंधित यंत्रणेकडून तसे झाले नाही. त्यामुळे पाचही सहायक आयुक्तांची बैठक घेऊन मी नव्याने नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका , अमरावती.