आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Occasion Of Daughter's Birthday Give Saree And Other To Farmers Widows

मुलीच्या वाढदिवशी शेतकरी विधवांचा सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शेतकरी विधवा महिलांचा सन्मान करताना देवळे परिवार उपस्थित मान्यवर.
अंजनगाव सुर्जी - शेतकऱ्यांचीअवस्था कधी नव्हे एवढी ढासळली आहे. जीव देण्यापर्यंत टोकाचा निर्णय या भूमिपुत्रांकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांचा कुणीच वाली नाही, ही भावना वाढीस लागली आहे. काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या मदतीला ‘माणसं’ धावून येत आहे. आर्थिक गर्तेत फसलेल्या शेतकऱ्यांना कोरड्या सांत्वनेची गरज नसून जगण्यासाठी आर्थिक मदतीचीच गरज आहे. ही बाब हेरून समाजाचे आपणही देणे लागतो या जबाबदारीचे भान ठेवत मुलीच्या वाढदिवसाच्या कौटुंबिक कार्यक्रमात तीन शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना साडी-चोळी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याची माणुसकी येथील देवळे कुटुंबीयांनी जोपासली आहे.

शहापुऱ्यात राहणारे शिक्षक बाळकृष्ण देवळे यांचे कुटुंब सुधारणावादी विचारसरणीचे मानले जाते. त्यांचा मुलगा सतीश देवळे मोर्शी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत नोकरीवर आहे. सतीश देवळे यांना स्वरा आणि शुभ्रा या दोन मुली आहेत. पाच वर्षीय स्वराचा वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह त्यांच्या नातेवाइकांनी धरला होता. परंतु, सुधारणावादी विचाराचे असलेल्या देवळे कुटुंबीयांनी वाढदिवसासारख्या कार्यक्रमात पैसे उधळणे आवडले नाही. आपल्याच तालुक्यातील मातीतील माणूस हलाखीच्या आर्थिक परिस्थिमुळे जीव देत आहे आणि आपण मुलीच्या वाढदिवसानिमित्त पैशांचा चुराडा करावा हे देवळे कुटुंबीयांना मनोमन पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी शहापुरा येथील मारोतीच्या मंदिरात १० सप्टेंबरला साधेपणाने स्वराचा वाढदिवस साजरा करून यानिमित्त तीन शेतकऱ्यांच्या विधवांचा फूल नाही फुलाची पाकळी, अशी आर्थिक मदत करून सन्मान करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून सामाजिक भान ठेवत तुम्ही एकटे नसून आम्हीही तुमच्यासोबत असल्याची भावना शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये निर्माण व्हावी, या भावनेने त्यांनी हिरापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी सीमा गजानन मेसरे, पांढरी येथील सुशीला विठ्ठलराव पातोंड स्वाती त्र्यंबकराव तायडे यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. देवळे कुटुंबीयांनी या तीनही पोशिंद्यांच्या लक्ष्मींना सन्मानाने साडी-चोळी दिली.

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा स्वरादेवळेच्या छोटेखानी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र कोकाटे, प्रा. प्रेमकुमार बोके उपस्थित होते. त्यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले. देवळे कुटुंबीयांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमात पुढाकार घेऊन जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी सुनीता बाळकृष्ण देवळे, जया सतीश देवळे, नर्मदाबाई देवळे, नागोराव देवळेसह मान्यवर उपस्थित होते.