आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटीवर ‘ऑनलाइन’चा उतारा, केंद्रांवर इंटरनेटद्वारे पोहोचणार प्रश्नपत्रिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेत प्रश्नपत्रिका इंटरनेटच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पोहोचणार आहे. डॉ. राजेश अग्रवाल समिती अहवालातील एक शिफारस प्रायोगिक स्तरावर विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेसाठी राबवली जाणार आहे. शिवाय केंद्रीय मूल्यांकन भवनात उत्तरपत्रिका ओएमआर बारकोडेड केली जाणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. जयंत वडते यांनी दिली.

अभियांत्रिकी विद्याशाखेतील सर्व सेमिस्टरच्या प्रश्नपत्रिका प्रथमच परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पाठवल्या जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर संबंधित केंद्रांवर प्रश्नपत्रिका विशिष्ट सॉफ्टवेअरद्वारे संकेतस्थळावर पाठवली जाईल. केंद्राधिकाऱ्यांना याबाबत एक पासवर्ड दिला जाणार आहे, तो कोड ऑनलाइन प्रणालीमध्ये टाकल्यास प्रश्नपत्रिका केंद्राधिकाऱ्यास प्राप्त होईल. केंद्रांवरच विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिकांच्या झेराक्स काढल्या जाईल. यापूर्वी प्रश्नपत्रिका विद्यापीठात छपाई करीत बंद लिफाप्यातून परीक्षा केंद्रांवर कर्मचारी घेऊन जात होते. यामध्ये पेपर फुटण्याची अधिक भीती होती. शिवाय लिफाफ्यातून वेगळ्या विषयाची प्रश्नपत्रिका गेल्यास परीक्षा रद्द करण्याची वेळ येत होती. यासोबतच प्रश्नपत्रिका केंद्रीय मूल्यांकन भवनात आल्यानंतर पहिल्या पानावरील विद्यार्थ्यांची माहिती असलेला भाग काढत बारकोड प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. उत्तरपत्रिकेवर मशीनद्वारे ओएमआर बारकोड प्रिंट केला जाणार आहे. विद्यार्थ्यांची माहिती या बारकोड क्रमांकानुसार संगणक प्रणालीत जतन होणार आहे. बारकोड प्रणालीमुळे पूर्वीची मास्किंग, डिमास्किंग प्रविष्ठीची पद्धत बंद होणार आहे. यामुळे गोपनीयता वाढण्यासोबत गुणवाढ प्रकरणालादेखील आळा बसण्याची शक्यता आहे. हिवाळी १४ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्राबाहेर काढत गुणवाढ करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल आहेत. शिवाय विद्यापीठात गुणवाढ करणारे मोठे रॅकेट चालत आहे, अशी बाबदेखील समोर आली. पेपर फोडणे तसेच मूल्यांकन करताना गुणवाढीस वाव असल्याने डॉ. राजेश अग्रवाल समितीने २०१२ मध्येच परीक्षा प्रणालीत सुधारणा करण्याचे सुचवले होते. याबाबत तब्बल ४३ विविध शिफारशींदेखील केल्या. २०१३ मध्ये शासनाने या शिफारशी लागू करण्याबाबत आदेश काढले. मात्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तब्बल दोन वर्षे कोणतीही कारवाई केली नाही. तांत्रिक सुधारणा होऊ नये म्हणून गुणवाढ करणाऱ्या रॅकेटचा दबाव असण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. मात्र गुणवाढ प्रकरणानंतर नाचक्की झाल्याने विद्यापीठाने धडा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॉ. अग्रवाल समितीच्या तांत्रिक शिफारशींवर टप्प्या-टप्प्याने अंमल करणे आरंभ केले आहे. याबदलासह पुनर्मूल्यांकन प्रक्रियादेखील काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन केली आहे.
१५ दिवसांचा कालावधी वाचणार
बारकोड प्रणालीचा अवलंब केला जाणार असल्याने १५ दिवसांचा कालावधी वाचणार आहे. उत्तरपत्रिका बारकोड केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माहितीचे डाटा एन्ट्री केली जाईल. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आल्यानंतर गुणदेखील अंक तालिकेत शिक्षकांना भरावे लागणार आहे. स्क्रुटीनीनंतर निकाल लावला जाणार आहे. मानवी कामे कमी झाल्याने या प्रक्रियेला गती मिळणार असल्याने निकाल लवकर लागण्यास मदत मिळेल.
विद्यार्थ्याला युनिक आय-डी
विद्यार्थ्यानेलिहिलेली उत्तरपत्रिका केंद्रीय मूल्यांकन भवनात तपासणीकरिता आणल्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती मास्किंग करता वेगळी केली जाणार आहे. पहिल्या पानावर मशीनद्वारे बारकोड प्रिंट केला जाणार आहे. या बारकोडसोबत विद्यार्थ्यांची माहितीची डाटा एन्ट्री होणार असून, विद्यार्थ्यास युनिक आय-डी मिळणार आहे. या युनिक आयडीनुसार निकाल लागेपर्यंत प्रणाली कार्य करणार आहे.