आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सव्वा सहा हजार कर्मचारी तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातसध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची धूम सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया शनिवारी पार पडणार आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, त्यासाठी तब्बल सव्वा सहा हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हे सर्व कर्मचारी शुक्रवारीच त्यांच्या नियुक्त केलेल्या ठिकाणांवर पोहोचणार आहेत.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सध्या पार पडत आहे. त्यात जिल्ह्यातील ५०२ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. मात्र, त्यापैकी ३१ ग्रामपंचायती अविरोध पार पडल्या तर १० ग्रामपंचायती अंशत: अविरोध झाल्या. त्यामुळे आता ४६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी अवघा एक दिवसाचा अवधी शिल्लक राहिला असल्याने गावोगावी चांगलेच राजकारण तापले आहे. त्यासोबतच यंदाच्या या निवडणुकीत बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने ही निवडणूक विशेष ठरत आहे. दरम्यान, शनिवारी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. ४६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक हजार ५६२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांवर तितकेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टम म्हणजेच ईव्हीएम उपलब्ध राहणार आहेत. या मतदान केंद्रांवरील कामकाज पाहण्यासाठी हजार २४१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व ठिकाणी निवडणुका शांततेत पार पडाव्या यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीनेही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच बाहेर ठिकाणांवरून पोलिस बंदोबस्त बोलावण्यात आला आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर शस्त्रबद्ध पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या कंपनीला पाचारण करण्यात आले आहे. त्यासोबतच शुक्रवारपासून निवडणूक असलेल्या गावांमध्ये आणि ग्रामपंचायतींच्या परिसरात पोलिसांची गस्त मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिसांच्या लिस्टवर असलेल्या आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. अवैध मद्य विक्रीची आणि मतदारांना प्रलोभने देण्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने त्यासंदर्भातही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये मद्य विक्री राहणार बंद
निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी दिवसभरासाठी आणि रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालाच्या दिवशीही मद्य विक्री बंद ठेवण्यात आली आहे. मात्र तरीही मद्य विक्री होऊ शकते ही शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे.

पाेटनिवडणूक होणार
निवडणुकाजाहीर झाल्या त्या वेळी या टप्प्यात १३० ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार होत्या. त्यापैकी ४३ ठिकाणच्या पोटनिवडणुका या अविरोध झाल्या. त्यासोबतच ५९ ठिकाणांसाठी एकही उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या केवळ २८ जागांसाठी शनिवारी पोटनिवडणुका पार पडणार आहेत.

आज कत्ल की रात
निवडणुकीच्याआदल्या दिवशीची रात्र ही कत्ल की रात म्हणून ओळखल्या जाते. याच रात्रीतून उमेदवारांना पैसा, दारू आणि इतर प्रलोभने देणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात येते. त्यामुळे एका रात्रीतून निवडणुकीचे चित्र पालटण्याची शक्यता असते. त्यामुळे या रात्री चोख बंदोबस्ताची पोलिसांची जबाबदारी वाढलेली असते. कार्यकर्तेही विरोधकांवर लक्ष ठेवतात.

तगडा पोलिस बंदोबस्त
ग्रामपंचायतनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिस उपअधीक्षक, २३ पोलिस निरीक्षक, १०८ पोलिस अधिकारी, १९४४ पोलिस कर्मचारी, ९०६ गृहरक्षक दलाचे जवान आणि राज्य राखीव दलाच्या १८ सेक्शन तैनात करण्यात आले आहे. त्यांना गस्त करता यावी यासाठी १३७ जीप आणि १७ पोलिस व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच १४९ बिनतारी संदेश संच त्यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

प्रचार तोफा थंडावल्या
ग्रामपंचायतनिवडणुकीच्या प्रचारासाठी देण्यात आलेली मुदत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संपली असल्याने उमेदवारांकडून सुरू असलेली प्रचाराची धूम आता शांत झाली आहे. यानंतर आता शुक्रवारी दिवसभर घरोघरी भेटी देऊन मूक प्रचार करण्याचा सपाटा उमेदवारांकडून सुरू करण्यात येणार आहे.