आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेजरपुरा पोलिसही राबवणार शहरात 'रेवसा' पॅटर्न'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त. - Divya Marathi
सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.
अमरावती - शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रेवसा गावातील अवैध देशी दारूची विक्री बंद करून पोलिसांनी त्या गावातील बालकांसाठी वाचनालय सुरू केले. एवढेच नव्हे, तर अशिक्षित महिलांसाठी रात्रशाळेची व्यवस्था केली, रोजगारासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्रेजरपुरा परिसरातील सुशिक्षित तरुणांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण आणि बालकांसाठी वाचनालय सुरू करण्याचा पोलिसांनी निर्धार केला असून, त्या कामाला सुरुवात झाली आहे.

फ्रेजरपुरा हा शहरातील मध्य वस्तीतील भाग आहे. या परिसरात असलेल्या तरुण सुशिक्षित बेरोजगारांसाठी पोलिसात किंवा सैन्यात नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, हा उद्देश समोर ठेवून या भागातील तरुणांना विनामूल्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी पोलिस काही स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींची मदत घेणार आहे. त्यानंतर या तरुणांना पोलिस भरती किंवा सैन्यातील भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शनसुद्धा पोलिसांकडून तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे.

समाजसेवी संस्थांची घेणार मदत
फ्रेजरपुरापरिसरातील युवकांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आम्ही काही समाजसेवी संस्थांची मदत घेणार आहोत. तसेच वाचनालय सुरू करायचे आहे. या कामाला सुरुवात झाली असून, त्यासंदर्भात परिसरातील नागरिकांसोबत बैठक घेतल्याचे फ्रेजरपुराचे ठाणेदार देवराज खंडेराव यांनी सांगितले.

काय आहे रेवसा पॅटर्न?
रेवसागावात काही दिवसांपूर्वी अवैध दारू विक्री केंद्रावर धाड टाकली असता १२ ते १५ या वयोगटांतील काही बालके दारूच्या आहारी गेल्याचे, त्यांचे शैक्षणिक ज्ञानसुद्धा मोजकेच असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी या बालकांसाठी वाचनालय, महिलांसाठी रात्र शाळेची व्यवस्था केली. गरजू महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लवकरच होईल प्रत्यक्षात सुरुवात
फ्रेजरपुरापरिसरात रेवसा पॅटर्न राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येथे भरतीपूर्व प्रशिक्षण, वाचनालय, रोजगार निर्मितीसाठी बोलणी सुरू आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त.