आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौर शेख जफरला पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराचे उपमहापौर शेख जफरला काही महिन्यांपूर्वी शहर पोलिसांनी अमरावती शहर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असतानाही जफरचे शहरात वास्तव्य असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी (दि. २३) सायंकाळी कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी जफरला नमुन्यातून ताब्यात घेऊन दुचाकीनेच पोलिस ठाण्यात आणून अटक केली.

शेख जफरविरुद्ध शहरात शहराबाहेर प्राणघातक हल्ला, खंडणीचा प्रयत्न यासह अन्य गुन्हे दाखल आहे. यातही मागील वर्षी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणात जफर सहभागी असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यामध्ये पोलिसांनी जफरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अंदाजे चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी जफरविरुद्ध तडीपारीचे आदेश काढले. तडीपार आदेशामुळे जफरला शहरात वास्तव्य करता येत नाही. असे असले तरी जफर तडीपार काळातही शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, एका महिन्यापूर्वी एका मालमत्तेच्या व्यवहारात जफरने घरी बोलावून धमकी दिली तसेच रक्कम मागितली, अशी तक्रार कोतवाली पोलिसात एका मालमत्ताधारकाने दिली होती. त्या तक्रारीवरून जफरसह सात जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यामुळे गुन्हे शाखेचे पोलिस पकडण्यासाठी त्याच्या नमुनास्थित घरी पोहोचले. त्या वेळी पोलिसांना पाहून जफरने दुचाकीने पळ काढला होता. या गुन्ह्यांमध्ये जफरला अटकपूर्व जामीन मिळाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तडीपार असताना जफरचे शहरात वास्तव्य आढळल्यास त्याला अटक करण्यात येणारच होती. यातच बुधवारी सायंकाळी कोतवालीचे ठाणेदार दिलीप पाटील दुचाकीने हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी नमुना भागात जफर त्यांना आढळून आला. दिलीप पाटील यांनी त्याच वेळी जफरला पकडले दुचाकीनेच शहरातून गाडगेनगर पोलिस ठाण्यात नेले. जफरला पकडल्यामुळे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी तातडीने गाडगेनगर ठाण्यात पोहोचले होते. बुधवारी रात्रीपर्यंत पोलिस अधिकारी गाडगेनगर ठाण्यातच होते.

बुधवारी सायंकाळी आम्ही ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होतो. त्याच वेळी नमुना परिसरात शेख जफर दिसला. शेख जफरला काही महिन्यांपूर्वीच दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार असूनही शहरात आढळल्यामुळे अटक करण्यात आली आहे. दिलीप पाटील, ठाणेदार, शहर कोतवाली.