आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Immediately Take Action, Professor Get Back 34 Thousand 600 Rs

ऑनलाइन फसवले, पोलिसांनी हसवले - प्राध्यापकाला परत मिळाले ३४ हजार ६०० रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हॅलो,मी बँकेतून बोलतो, तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. तुम्हाला नवीन कार्ड द्यायचे आहे, त्यामुळे मला तुमच्या एटीएमवरील १६ अंकी क्रमांक सांगा. या स्वरूपाचे कॉल करून अनेक खातेधारकांना गंडा घालणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संबंधित फोन करणाऱ्याला १६ अंकी क्रमांक सांगितला की, आपण फसलो म्हणून समजा. परंतु, खातेदाराची जागरूकता तत्परतेमुळे फसगत झालेली रक्कम परत मिळू शकते. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका प्राध्यापकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन उडवलेले ३४ हजार ६०० रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.

बँक अधिकारी बोलत असून, तुमच्या एटीएम कार्डमध्ये अडचण आली आहे. ते ब्लॉक झालेले आहे, तुम्हाला नवीन एटीएम कार्ड द्यायचे आहे. अशा नानाविध सबबी पुढे करून नागरिकांना फसवण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. याच पद्धतीने शहरात राहणाऱ्या एका प्राध्यापकाला शनिवारी (दि. १९) दुपारी वाजता फोन आला. बँकेतून बोलतो आहे, तुमच्या एटीएम कार्डवरील १६ अंकी क्रमांक सांगा, असे सांगितले. त्यामुळे प्राध्यापकाने हा क्रमांक सांगितला. त्यानंतर पुन्हा त्याने कार्डवरील मागे असलेला चार अंकी सीव्हीव्ही क्रमांक मागितला, प्राध्यापकानेसुद्धा दिला. ही प्रक्रिया सुरूच असताना प्राध्यापकाच्या मोबाइलवर एक एसएमएस आला. या क्रमांकामध्ये आलेला ओटीपी क्रमांक सांगा, असे त्याने सांगितले. तो क्रमांक प्राध्यापकाने त्याला सांगितला. या ओटीपीच्या (वन टाइम पासवर्ड) आधारे त्या व्यक्तीने प्राध्यापकाच्या बँक खात्यातून अवघ्या १० मिनिटांत ३४ हजार ६०० रुपयांची खरेदी केली. या प्रक्रियेनंतर काही वेळातच प्राध्यापकांना बँक खात्यामधून ही रक्कम कमी झाल्याबाबत मॅसेज आला. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे त्यांना लक्षात आले. या प्रकारामुळे त्यांनी तातडीने राजापेठ पोलिस ठाणे गाठून उपस्थित अधिकाऱ्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला. राजापेठ पोलिसांनी प्राध्यापकाला बँकेतून संबंधित व्यवहाराच्या पासबुक नोंदी आणायला सांगितल्या. या नोंदीवरून कोणकोणत्या कंपनीकडून कोणती किती रकमेची खरेदी झाली आहे, हे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी संबंधित कंपनीला ई-मेल केला. या ई-मेलसोबत प्राध्यापकाचे ओळखपत्र, पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, हा व्यवहार झाल्याच्या पासबुक नोंदी तसेच ज्या क्रमांकावरून फोन आला होता. तो मोबाइल क्रमांक या ई-मेलमध्ये नोंदवण्यात आला. तसेच माझ्यासोबत फसवणूक झाल्यामुळे सदर व्यवहार रद्द करून माझी रक्कम परत करावी, असा मजकूर ई-मेलद्वारे कंपनीला पाठवला. या ई-मेलद्वारे कंपनीने पुढील प्रक्रिया थांबवून फसवणूक झाल्याबाबतची खात्री केली. तसेच शनिवारी रात्रीपर्यंत संपूर्ण रक्कम प्राध्यापकाच्या खात्यावर जमा केल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली आहे.

फसवणूकझाल्यास काय करावे : ज्यावेळी अनोळखी क्रमांकावरून फोन येतो बँकेतून बोलतो असे सांगून फसवणूक होते. नागरिकांनी अशा अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवरून किंवा फोनवरून एटीएम किंवा बँक खात्याची माहितीच देऊ नये. चुकीने माहिती देऊन आपली फसवणूक झाल्यास आपण तातडीने (जितके लवकर बँकेत जाता येईल) बँकेत जाऊन पासबुकवर नुकत्याच झालेल्या व्यवहाराच्या नोंदी घ्याव्यात. या नोंदीवरून फसवणूक करणाऱ्याने नेमक्या कोणत्या कंपनीकडून ऑनलाइन खरेदी केली.

ही बाब पुढे येते. त्या कंपनीच्या नावावरून त्या कंपनीचे मेल अॅड्रेस गुगलच्या मदतीने शोधावे. तसेच सदर रक्कम काढणाऱ्याने माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे हा व्यवहार रद्द करून माझी रक्कम माझ्या खात्यात जमा करावी, असा मेल करावा. या मेलसोबत बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, ज्या व्यवहाराद्वारे फसगत झाली, त्या व्यवहाराच्या पासबुकवरील बँकेच्या नोंदी, ज्या क्रमांकावरून फोन आला होता तो क्रमांक स्वत:चे ओळखपत्र स्कॅन करून ई-मेल करावा. अशा पद्धतीने संबंधित कंपनीला आपण माहिती देऊ शकतो. या माहितीच्या आधारे संबंधित कंपनी खात्री करून सदर व्यवहार रद्द करून आपली रक्कम परत करू शकते. किंवा फोन आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँकेतून पासबुकवर नोंदी घेऊन पोलिस ठाण्यासोबत संपर्क करावा. या प्रक्रियेचा वापर घटना घडल्यानंतर १५ ते २० मिनिटांत किंवा यापेक्षाही तातडीने झाल्यास रक्कम परत मिळण्याची दाट शक्यता आहे, असे राजापेठचे सहायक पोलिस निरीक्षक रवी राठोड यांनी दै. ‘दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
आठमहिन्यांमध्ये घडले ४३ गुन्हे : ऑनलाइनफसवणूक करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा ठाण्यांमध्ये तब्बल ४३ गुन्हे ऑनलाइन फसवणुकीचे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा शोध घेताना आतापर्यंत पोलिसांना आरोपी अटक करण्यात यश आले नाही. त्यामुळे अशा घटनेला आपणच आवर घालू शकतो.

रक्कम परत मिळवली
शहरातील एका प्राध्यापकाची ऑनलाइन फसवणूक झाली होती. त्यांनी तातडीने ठाण्यात येऊन माहिती दिली. त्याआधारे आम्ही त्यांना प्रक्रिया सांगून संबंधित कागदपत्रे बँकेच्या पासबुकच्या नोंदी मागितल्या. त्याआधारे कंपनीला ई-मेल केला.शनिवारीही रक्कम परत मिळाली. रवीराठोड, सहायक पोलिस निरीक्षक, राजापेठ.

पोलिसांशी संपर्क करावा
फोन किंवा मोबाइलवरून आपण आपल्या बँक खाते किंवा एटीएमची माहिती कोणालाही देऊ नये. तसेच ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना घटनाक्रम सांगावा., यासंदर्भात तांत्रिक मार्गाने रक्कम परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.